भारताचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीत पाच स्थानांची झेप घेत पाचवे क्रमांक पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहितला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. पाच सामन्यांच्या मालिकेत रोहितने दोन शतके व एक अर्धशतकासह ४४१ धावा फटकावल्या. विराट कोहली या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे, तर कर्णधार महेंद्रसिंग धोनी सात स्थानांच्या घसरणीसह १३व्या स्थानावर गेला आहे.
२८ वर्षीय रोहितने ऑस्ट्रेलियातील कामगिरीच्या जोरावर ५९ गुणांची कमाई केली आहे आणि तो कोहलीपेक्षा ६४ गुणांनी पिछाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेचा एबी डी’व्हिलियर्स (९००) अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे भारताने सिडनी येथील सामना जिंकून दुसरे स्थान कायम राखले आहे. मालिकेतील दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी क्रमवारीत झेप घेतली. ग्लेन मॅक्सवेल (८) आणि स्टीव्हन स्मिथ (१५) यांची अनुक्रमे दोन व पाच स्थानांची सुधारणा झाली आहे, तर डेव्हिड वॉर्नर (१८), मिचेल मार्श (४३) आणि जॉन हेस्टिंग्ज (४९) यांनी कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थान पटकावले आहे.

Story img Loader