श्रीलंकेविरुद्धचा पहिला वन-डे सामना भारतीय संघाने ९ गाडी राखत जिंकला. कसोटी मालिकेप्रमाणे पहिल्या वन-डे सामन्यातही श्रीलंकेच्या संघाकडून भारताला कोणत्याही प्रकारचा प्रतिकार झाला नाही. संपूर्ण सामन्यात भारतीय संघाचं पारडं हे वरचढं दिसलं. मात्र दुसऱ्या डावात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ज्या पद्धतीने धावबाद झाला, त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगताना दिसत आहे.
श्रीलंकेने दिलेल्या २१७ धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. शिखर धवन आपल्या नेहमीच्या शैलीत धडाकेबाज फलंदाजी करत होता, मात्र दुसऱ्या बाजूने रोहित शर्मा मात्र थोडा अडखळत होता. अखेर चोरटी धाव घेण्याच्या नादात तो धावबाद झाला आणि लंकेला या सामन्यातलं पहिलं यश मिळालं. धाव घेताना रोहीतची बॅट ही खेळपट्टीवर अडकून खाली पडली. ज्यावेळी बॉल स्टम्पला जाऊन आदळला त्यावेळी रोहितचा पाय हा हवेत असल्याचं रिप्लेमध्ये दिसतं होतं. यानूसार तिसऱ्या पंचांनी रोहीत शर्माला बाद ठरवलं. मात्र हा सामना जर १ ऑक्टोबर रोजी खेळवला असता, तर आयसीसीच्या नवीन नियमांनूसार रोहीत शर्मा नाबाद ठरला असता.
Watch: #RohitSharma Dismissed in a Bizarre Fashion! pic.twitter.com/KKGWTU78Li
— CricShots Videos (@cricketrending) August 20, 2017
काय आहे आयसीसीचा नवीन नियम ?
आयसीसीच्या नियमावलीतील २९ अ या कलमानूसार एखादा खेळाडू हा क्रिजच्या बाहेर असल्यास त्याला धावबाद ठरवण्यात येतं. मात्र हा नियम १ ऑक्टोबरपर्यंतच वैध आहे.
आयसीसीच्या नवीन नियमांनूसार १ ऑक्टोबरपासून होणाऱ्या प्रत्येक सामन्यात, जर फलंदाजाची बॅट हवेत असल्यास त्याला नाबाद ठरवण्यात येणार आहे. याचसोबत बॉल स्टम्पवर आदळण्याच्या आधी फलंदाजाच्या शरीराच्या कोणताही भाग हवेत असल्यास त्याला नाबाद ठरवण्यात येणार आहे. यावेळी त्याची बॅट हवेत असली तरीही कोणताही फरक पडणार नाही.
याआधीही रोहित शर्मा अशाच पद्धतीने धावबाद झालेला आहे. चॅम्पियन्स करंडकात पाकिस्तानविरुद्ध साखळी सामन्यात खेळताना रोहित शर्माची बॅट हवेत असल्यामुळे धावबाद झाला होता. हा सामना जरी भारताने जिंकला असला तरीही रोहितचं शतक हे ९ धावांनी हुकल्यामुळे सर्व चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी काळात रोहीत शर्मा कसा खेळ करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.