Umpiring against Rohit Sharma is very easy Anil Chaudhary reveals : भारतीय पंच अनिल चौधरी यांनी कर्णधार आणि फलंदाज रोहित शर्माबाबत मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्याने रोहित शर्माविरुद्ध अंपायरिंग करण्याचा अनुभव सांगितला आहे. अनिल चौधरी म्हणाले, रोहित शर्माविरुद्ध अंपायरिंग करणे सोपे असल्याचे सांगितले. अंपायर चौधरी यांनीही यामागचे कारण सांगितले आहे. त्यांनी रोहित शर्माच्या फलंदाजीचेही कौतुक केले. ते म्हणाले रोहितला फलंदाजी करताना पाहून मजा येते. जणू काही संगीत वाजत आहे, असे वाटते.
अंपायर अनिल चौधरी यांनी शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर रोहित शर्माबद्दल सांगितले की, “रोहित शर्मासारख्या खेळाडूसाठी अंपायरिंग करणे खूप सोपे आहे. एकतर तो आऊट असतो किंवा नॉट आउट असतो. त्याचे काम सोपे आहे. त्याचे साधे आणि सरळ काम असते. तो टुक-टूक करत खेळत नाही. त्यामुळे तो एकतर आऊट असतो किंवा नॉट आऊट असतो. अशा खेळाडूला अंपायरिंग करणे सोपे असते. तुम्ही कधीही बघा तो स्पष्टपणे आऊट तर असतो किंवा नॉट आऊट असतो.”
रोहितच्या फलंदाजीबद्दल अनिल चौधरी म्हणाले, “तो एक नैसर्गिक फलंदाज आहे. तो १५०-१६० किलोमीटर प्रतितास वेगाने येणाऱ्या चेंडूला १२० च्या वेगाप्रमाणे पाहतो. त्याचा फूटवर्क अप्रतिम आहे. तो फार वेगाने पुढे धावत नाही. मागे राहतो, चेंडूची वाट पाहतो. क्रिकेटमध्ये एक संज्ञा आहे… बॉल सेन्स. त्याच्याकडे जबरदस्त बॉल सेन्स आहे. कोणत्या चेंडूसाठी पुढे जायचे आणि कोणत्या चेंडूसाठी मागे राहायचे हे त्याला चांगल्या पद्धतीने माहीत आहे.”
रोहितच्या फलंदाजीचे कौतुक करताना अनिल चौधरी इथेच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, “त्याचा शॉर्ट आर्म पुल बघा, काय मारतो, बाप रे बाप… मी एका सामन्यात टीव्ही अंपायर होतो. तेव्हा त्याने २०० हून अधिक धावा केल्या होत्या. यार, जे चेंडू इतर फलंदाजांसाठी यॉर्कर ठरत होते, तो त्यांच्यावर षटकार मारत होता. माझ्या मते तो कोलकात्यातला सामना होता. त्याचा क्लास वेगळा आहे. तो आळशी वाटतो, पण त्याला याची कल्पना आहे.”