प्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छुक असून, यासंदर्भात धवल कुलकर्णीने आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली.
सोमवारी सायंकाळी मुंबईमध्ये या भेटीत धवल कुलकर्णी व ‘क्रिककिंगडम’चे पराग दहिवल यांनी या संकल्पनेवर अशोक चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. नांदेडमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असून, ही अकादमी सुरू झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीचे दर्जेदार प्रशिक्षण मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
धवल कुलकर्णीने यावेळी अकादमीसंदर्भात विस्तृत माहिती दिली व नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. कुलकर्णी व दहिवल यांनी या भेटीची आठवण म्हणून अशोक चव्हाण यांना एक टी-शर्ट भेट दिला. या अकादमीच्या उभारणीची चर्चा करण्यासाठी पुढील बैठक लवकरच होणार आहे.