भारतीय संघ हा इंग्लंड दौऱ्यावर टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. या संघात स्फोटक सलामीवीर रोहित शर्माचा समावेश आहे. रोहितला पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली, मात्र त्यातून त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्याने ३० चेंडूत ३२ धावा केल्या. मात्र, भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिल्या अर्धशतकाबाबत एक गुपित सांगितले आहे.
एका मुलाखतीदरम्यान दिनेश कार्तिक म्हणाला कि रोहित शर्माने पहिले अर्धशतक हे माझ्या बॅटने झळकावले होते. ज्यावेळी रोहितला सामना खेळायची संधी मिळाली, त्यावेळी त्याच्याकडे बॅट नव्हती. त्याने माझी बॅट पाहिली आणि ही बॅट मला खेळायला दे, असे म्हणाला. मीदेखील क्षणाचा विलंब न करता त्याला बॅट देऊन टाकली आणि योगायोगाने ती बॅट त्याच्यासाठी ‘लकी’ ठरली.
याच कार्यक्रमात काही दिवसांनी पाहुणा म्हणून आलेल्या रोहितला याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्याने हे खरे असल्याचे सांगितले. ‘कार्तिककडे बॅट मागितली, तेव्हा माझ्याकडे खेळण्यासाठी बॅट नव्हती. म्हणून मला त्याची बॅट मागावी लागली. पुढे ७-८ महिने त्याच बॅटने फलंदाजी केली’, असेही रोहितने कबूल केले. तसेच, संपूर्ण संघात सर्वात चांगल्या बॅट दिनेश कार्तिककडेच असतात, असेही रोहित म्हणाला.