बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारत पराभूत झाल्याने तीन सामन्यांच्या मालिकेत यजनाम संघाने २-० अशी आघाडी मिळवली आहे. डाव्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीनंतरही फलंदाजीला येत कर्णधार रोहित शर्माने २८ चेंडूंत नाबाद ५१ धावांची खेळी केली. मात्र, त्याच्या झुंजार खेळीनंतरही भारताला दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान बांगलादेशकडून पाच धावांनी हार पत्करावी लागली. मात्र या पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने रोहित शर्माच्या झुंजार खेळीचं कौतुक केलं.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना रोहितने मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर अनामुल हकचा झेल सोडला. यावेळी त्याच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्याला फिजिओंसोबत मैदानाबाहेर जावे लागले. त्यानंतर त्याला ढाका येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्याची क्ष-किरण चाचणी झाली. त्याच्या अंगठयाला टाकेही घालावे लागले. अखेर त्याने फलंदाजी केली. मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडले. शेवटच्या चेंडूवर सहा धावांची गरज असताना रोहितला षटकार लगावता आला नाही आणि भारताचा पराभव झाला. या पराभवानंतर रोहितच्या दुखापतीसंदर्भात प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी माहिती दिली. रोहितच्या अंगठाल्या झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची नसली तरी चिंता करण्याइतकी नक्कीच असल्याचं द्रविडने म्हटलं आहे.

“त्याला रुग्णालयामध्ये जावं लागलं. त्याच्या हातातील अंगठ्याजवळचं हाड सरकलं आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये जावं लागलं. काही इंजेक्शन्सही त्याने घेतली आणि तो मैदानावर परतला. त्याला यासाठी श्रेय द्यायला पाहिजे. मैदानावर उतरुन संधी आजवण्याची त्याची इच्छा होती आणि त्याने ते करुन दाखवलं. त्या आम्हाला विजयाच्या इतक्या जवळ नेलं हे फारच अद्भूत होतं,” असं द्रविड म्हणाला.

रोहित शर्माने पाच षटकार आणि तीन चौकार लगावले. मोहम्मद सिराजबरोबर फलंदाजी करताना रोहित भारताला विजयाच्या समीप घेऊन गेला. मात्र अगदी शेवटच्या चेंडूवर बांगलादेशने सामना जिंकला. द्रवीडने रोहित शेवटच्या एकदिवसीय सामन्यामध्ये खेळणार नसल्याचं सांगितलं. रोहित मुंबईला रवाना होणार असून तो या अंगठ्याच्या दुखापतीमुळे पुढील कसोटी मालिकाही खेळू शकणार नाही अशी शक्यता द्रविडने व्यक्त केली.

“संघातील काही खेळाडूंना दुखापत झाली आहे. हे योग्य नाही. कुलदीप, दीपक आणि रोहित पुढील सामन्यामध्ये खेळणार नाही. रोहित पुढील सामन्यात नसणार कारण तो मुंबईला रवाना होणार आहे. तिथे तो अंगठ्याला झालेल्या दुखापतीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे,” असं द्रविड म्हणाला.