Rohit Sharma fan 10 years wait for Autograph video viral : रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय क्रिकेटचे दोन असे स्टार आहेत, ज्यांच्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. या दोघांकडून कधी ऑटोग्राफसाठी तर कधी सेल्फीसाठी चाहत्यांमध्ये नेहमीच चढाओढ असल्याचे पाहिला मिळते. आता असाच एक ऑस्ट्रेलियातील व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात कर्णधार रोहित शर्माने त्याच्या चाहत्याची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण केली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो बीसीसीआयनेच शेअर केला आहे.
रोहितच्या चाहत्याची १० वर्षांची प्रतिक्षा संपली –
रोहित-कोहलीला भेटण्याचे प्रत्येक क्रिकेटप्रेमीचे स्वप्न असते. ज्यामध्ये काही नशीबवान पटकन यशस्वी होतात, तर काही संघर्ष करत राहतात. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दिसत आहे. दरम्यान, आजही हिटमॅनचा ऑटोग्राफ घेण्याची संधी हुकणार, असे वाटणाऱ्या एका चाहत्याला रोहितने खूश केले. जो १० वर्षांपासून रोहित शर्माच्या ऑटोग्राफच्या प्रतिक्षेत होता. तो रोहित शर्माला इतरांना ऑटोग्राफ देताना पाहून म्हणतो, ‘रोहित भाई प्लीज, १० वर्ष झाली यार.’ हे ऐकून रोहित शर्मा हसला आणि त्याची प्रतिक्षा संपवली. रोहितने त्याला मोठ्या मनाने ऑटोग्राफ दिला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अॅडलेड कसोटी कधीपासून होणार सुरुवात?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना ६ डिसेंबरला अॅडलेड येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघाने पर्थमध्ये शानदार विजयाची नोंद करत मालिकेची शानदार सुरुवात केली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया अनेक वर्षांपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शोधात आहे आणि पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. सराव सामन्यात भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली. आता ॲडलेडमध्ये कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा – WTC Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारत कसा पात्र ठरेल? कोणती आहेत चार समीकरणं? जाणून घ्या
रोहित शर्मा पुन्हा ठरला फ्लॉप –
पर्थ कसोटी गमावल्यानंतर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला पोहोचला. भारतीय कर्णधाराने ऑस्ट्रेलियात पाऊल ठेवताच तयारी सुरू केली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूची डे-नाईट कसोटी खेळली जाणार आहे. या सामन्याच्या तयारीसाठी भारतीय संघाने कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसांचा गुलाबी चेंडूचा डे-नाईट सराव सामना खेळला. सामन्याचा पहिला दिवस पावसाने वाया गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ४६-४६ षटकांचा सामना खेळवण्यात आला, ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा केवळ ३ धावा करून बाद झाला. त्याचे फलंदाजीतील अपयश भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत आहे.