सलामीचा फलंदाज म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपविल्यानंतर माझी कारकीर्द बहरली आहे आणि सध्या हा माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्तम काळ आहे, असे भारताचा सलामीवीर रोहित शर्माने सांगितले. ‘‘कारकिर्दीत सातत्यपूर्ण फलंदाजी मी याच मोसमात केली आहे व सलामीवीर म्हणून नवीन भूमिकेतही मला खेळाचा निखळ आनंद देत आहे. फलंदाजीतील यशामुळे मी संघाला विजेतेपद मिळवून देण्यात माझे योगदान देऊ शकलो, याचेच मला खूप समाधान वाटते आहे. या पुढे अशीच कामगिरी माझ्याकडून होईल अशी मला खात्री आहे,’’ असे रोहितने सांगितले.
मुंबईचा २६ वर्षीय खेळाडू रोहितने आतापर्यंत १२ वेळा सलामीवीर फलंदाज म्हणून खेळताना पाच अर्धशतके झळकावली आहेत, तर दोन वेळा त्याची अर्धशतके हुकली आहेत.
खेळातील तंत्राविषयी विचारले असता रोहित म्हणाला, ‘‘सलामीच्या फलंदाजाला खूप वेगळे तंत्र वापरावे लागते. फलंदाजीतील अग्रक्रमांकांमध्ये खेळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली तरी मी कोणतेही दडपण न घेता माझा नैसर्गिक खेळ करीत असतो. त्याचबरोबर सलामीच्या जबाबदारीचे भान ठेवून मी खेळतो. मी ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये अनेक वेळा सलामीला खेळलो असल्यामुळे एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना मला कोणतीही अडचण येत नाही. सलामीला येण्याची जबाबदारी माझ्यासाठी नवीन नाही.’’
सलामीला फलंदाजी करण्यास सांगितल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला काय, असे विचारले असता रोहित म्हणाला, ‘‘जेव्हा तुमच्यापुढे आव्हाने ठेवली जातात, तेव्हा तुमचा स्वत:च्या क्षमतेवर विश्वास असला पाहिजे. इंग्लंडविरुद्ध केलेली ८३ धावांची कामगिरी ही माझ्यासाठी सर्वोत्तम खेळी नाही, मात्र त्यामुळे आपण सलामीलाही चांगली फलंदाजी करू शकतो, हा आत्मविश्वास या खेळीमुळे मिळाला.’’