Rohit Sharma equaled MS Dhoni’s record : भारताने अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० मालिका ३-० अशी जिंकली. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडियाने अफगाणिस्तान संघाचा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावून अनेक विक्रम केले. याशिवाय त्याने कर्णधार म्हणूनही एक मोठी कामगिरी केली. रोहित टी-२० मध्ये भारताचा संयुक्त सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या सर्वाधिक टी-२० सामने जिंकून देण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ५४व्यांदा सामना खेळायला आला होता. त्यांचा हा ४२वा विजय ठरला. या अगोदर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ४२ सामने जिंकले होते. धोनीबद्दल बोलायचे तर त्याने ७२ सामन्यांत संघाची धुरा सांभाळली. या काळात भारताने ४२ सामने जिंकले होते. धोनीच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी रोहित शर्माला अफगाण संघाविरुद्धचे सर्व सामने जिंकावे आवश्यक होते, जे रोहित शर्माने करुन दाखवले. रोहितने टी-२० वर्ल्ड कपमध्ये कर्णधारपद भूषवल्यास तो धोनीला मागे टाकू शकतो.

संघ निवडकर्त्यांना दिले चोख प्रत्युत्तर –

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी रोहित शर्मावर टी-२० खेळण्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, खुद्द निवडकर्त्यांनाही या खेळाडूला संघात ठेवण्यात फारसा रस दिसत नव्हता. रोहित शर्माचा फिटनेस आणि वय त्याच्यासाठी अडथळे ठरत होते, पण तिसऱ्या सामन्यात रोहितने ज्या प्रकारे कामगिरी केली त्यावरून तो टी-२० विश्वचषक खेळण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्ट झाले. रोहित शर्माने शतक झळकावून संघ निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा – IND vs AFG : भारताचा २१२ धावांचा डोंगर, गुलबदीन-नबीचा प्रतिहल्ला, मॅच टाय; दोन सुपरओव्हरनंतर विजयी सुस्कारा!

काय घडलं सामन्यात?

भारतीय कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होती. टीम इंडियाने २० षटकात ४ विकेट गमावत २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्ताननेही २० षटकांत ६ गडी गमावून २१२ धावा केल्या. यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. अफगाणिस्तानने पहिल्या सुपर ओव्हरमध्ये १६ धावा केल्या. भारताला १७ धावा करायच्या होत्या, पण रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंग हे मिळून केवळ १६ धावा करू शकले.

हेही वाचा – VIDEO : पंचांचा चुकीचा निर्णय अन् रोहित शर्माचा संताप; म्हणाला, “वीरू, पहले ही दो झिरो…”

यानंतर दुसरी सुपर ओव्हर झाली. यामध्ये भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ११ धावा केल्या. यावेळी रोहित आणि रिंकूशिवाय संजू सॅमसनने फलंदाजी केली. अफगाणिस्तानला १२ धावांचे लक्ष्य मिळाले. अफगाणिस्तान संघाला केवळ एक धाव करता आली. रवी बिश्नोईने दोन विकेट घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. अशा प्रकारे पहिल्यांदाच टीम इंडियाला एका सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळावे लागले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma equals ms dhoni on most wins by an indian captain in t20i cricket in ind vs afg 3rd t20 match vbm