IND vs AFG 1st T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला गेला. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माचा शुबमन गिलवर ओरडतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. रोहितने गुरुवारी मोहाली येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात शुबमन गिलसह डावाची सुरुवात केली. फझलहक फारुकीच्या पहिल्या षटकात एक डॉट खेळल्यानंतर, रोहितने थोडं पुढे येऊन चेंडूला मिड-ऑफकडे वळवलं. रोहितने शॉट खेळल्यानंतर धाव घेण्यासाठी नॉन स्ट्राइकिंग एंडवर असलेल्या शुबमन गिलला हाक दिली, पण शुबमनने ना त्याच्याकडे पाहिले ना त्याची हाक ऐकली. त्यामुळे दोघेही एकाच टोकाला उभे राहिले आणि रोहित शर्मा धावबाद झाला. यानंतर रोहित गिलवर भडकला आणि त्याचा हा संताप कॅमेऱ्यात कैद झाला. प्रथमदर्शनी रोहितने रागात शिवी दिल्याचं सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

याबाबत सामन्यानंतरच्या सादरीकरणात रोहितला प्रश्न केला गेला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील सलामीच्या सामन्यात स्वस्तात बाद झाल्याबाबत रोहित म्हणाला की, “या गोष्टी घडत असतात, आणि जेव्हा असं काहीतरी होतं तेव्हा तुम्ही निराश होता, राग येतो. तुम्हाला पीचवर राहून संघासाठी धावा काढायच्या असतात. पण सर्व काही आपल्याला हवे तसे होईल असे नाही. आम्ही सामना जिंकलो, हे जास्त महत्त्वाचे आहे. मला वाटलं होतं गिलने पुढे अजून चांगलं खेळावं पण दुर्दैवाने, लहान पण खूप चांगली खेळी खेळून तो बाद झाला.”

शिवम दुबे चमकला..

मोहाली येथे परतीच्या सामन्यात, ३६ वर्षीय रोहित दोन चेंडूत शून्यावर बाद झाला. मात्र, अष्टपैलू शिवम दुबे याने कमाल खेळी करत विजयामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. दुबेने ४० चेंडूत ६० धावा काढून भारताला १५९ धावांचे लक्ष्य १७.३ षटकांत पूर्ण करण्यास मदत केली. गिल (२३), तिलक वर्मा (२६) आणि जितेश शर्मा (३१) यांनीही फलंदाजी करताना महत्त्वपूर्ण योगदान दिले. दुसरे अर्धशतक झळकावल्याबद्दल आणि विकेट घेतल्याबद्दल, दुबेला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

सामनावीर दुबेबद्दल रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्मा म्हणाला की, “खूप चांगली गोष्ट आहे. शिवम दुबे, जितेश, तिलक आणि रिंकूही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पडताळून पाहायच्या आहेत. वेगवेगळ्या परिस्थितीत गोलंदाजांचा सामना करण्यासाठी संघ सज्ज असायला हवा. जसं आजच्या सामन्यात वाशीने १९ वं षटक टाकलं. आम्ही ज्या गोष्टींमध्ये काहीसे कमी पडतो तिथे आणखी सराव घेऊन सुधार करण्याची इच्छा आहे. आम्हाला हे प्रयत्न करायचे आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, आम्ही प्रयत्न करू आणि जे काही शक्य आहे ते करू पण अर्थात सामना जिंकणे हे नेहमीच सर्वात महत्त्वाचे असेल. “