मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल 2021चा 13वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आला. यात षटकांची गती संथ राखल्याप्रकरणी रोहितला दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलच्या नियमानुसार, रोहितची ही पहिली चूक असल्याने त्याला 12 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. अमित मिश्रा (4/24) आणि शिखर धवन (45 धावा) यांच्या कामगिरीमुळे दिल्लीने मुंबईवर 6 गड्यांनी विजय नोंदवला. चार सामन्यांमधील हा दिल्लीचा तिसरा विजय आहे. त्यांचे आता 6 गुण झाले असून गुणतालिकेत ते दुसर्‍या क्रमांकावर आहेत. मुंबईचा 4 सामन्यात दुसरा पराभव झाला असून ते 4 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.

 

दिल्लीची मुंबईवर मात

फिरकीपटू अमित मिश्राने केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर 6 गडी राखून विजय मिळवला. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचे स्टार फलंदाज मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरले. फिरकीला मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकात 9 बाद 137 धावा उभारल्या. रोहितव्यतिरिक्त (44) मुंबईच्या इतर फलंदाजांनी निराशा केली. आज दिल्ली संघात संधी मिळालेल्या अनुभवी अमित मिश्राने 4 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतले. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने केवळ 4 गडी गमावले. मिश्राला सामनावीर पुरस्कार मिळाला. तब्बल 10 वर्षानंतर दिल्लीने या मैदानावर विजय साकारला आहे. याआधी 2010मध्ये त्यावेळच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने चेन्नई सुपर किंग्जला चेन्नईत 6 गड्यांनीच मात दिली होती.

Story img Loader