Rohit Sharma flop show in IND vs NZ Test Series : पुणे कसोटीत न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी ३५९ धावांचे लक्ष्य दिले आहे. दुसऱ्या डावात शनिवारी (२६ ऑक्टोबर) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडला भारतीय गोलंदाजांनी २५५ धावांवर रोखले. त्यांनी पहिल्या डावात २५९ धावा केल्या होत्या. भारतीय संघ पहिल्या डावात १५६ धावांवर बाद झाला. आता ही सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावातील १०३ धावांच्या जोरावर ३५९ धावांचे लक्ष्य दिले. ज्यामुळे भारतीय चाहत्यांना कर्णधार रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होता, परंतु त्याने पुन्हा निराश केले.

रोहित शर्मा झाला स्वस्तात बाद –

न्यूझीलंडची दुसरा डाव आटोपल्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज क्रीजवर आले तेव्हा त्यांनी आक्रमक सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी ३४ चेंडूत ३४ धावांची भागीदारी केली होती. यशस्वी जैस्वाल एका बाजूने सतत धावा करत होता, तर दुसरीकडे, रोहितची बॅट शांत होती. सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर तो बाद झाला. त्याला केवळ ८ धावा करता आल्या. रोहितला मिचेल सँटनरने विल यंगच्या हाती झेलबाद केले. ज्यामुळे सोशल मीडियावर चाहते मीम्स शेअर करत त्याला ट्रोल करत आहेत.

रोहित आठ डावात सातवेळा अपयशी –

रोहितचा खराब फॉर्म कायम आहे. गेल्या ८ डावात तो ७ वेळा अपयशी ठरला आहे. या काळात त्याने केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. चेन्नईत बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहितने ६ आणि ५ धावा केल्या होत्या. यानंतर कानपूरमध्ये २३ आणि ८ धावा करून तो बाद झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो पहिल्या डावात २ धावा करून बाद झाला होता. बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने ५२ धावा केल्या. आता तो पुन्हा फ्लॉप ठकला. पहिल्या डावात त्याला खाते उघडता आले नाही तर दुसऱ्या डावात त्याला केवळ ८ धावा करता आल्या.

हेही वाचा – PAK vs ENG : पाकिस्तानने ३ वर्षांनी मायदेशात जिंकली कसोटी मालिका, साजिद-नोमानच्या जोरावर इंग्लंडचा उडवला धुव्वा

भारताला ३०० हून अधिक धावांचे लक्ष्य त्यांच्या घरच्या मैदानावर एकदाच पार करता आले आहे. भारताला २६ वेळा घरच्या मैदानावर ३०० किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारत १४ वेळा पराभूत झाला असून ९ सामने अनिर्णित राहिले आहेत. एक सामना बरोबरीत राहिला आहे. २००८ मध्ये चेन्नईमध्ये टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धचा सामना ३८७ धावा करुन जिंकला होता. भारताने पुण्यात ३५९ धावांचा पाठलाग केल्यास तो न्यूझीलंडविरुद्ध विक्रम ठरेल. किवी संघाविरुद्धच्या सामन्यातील चौथ्या डावातील हे सर्वात मोठे धावांचे आव्हान असेल. १९६९ मध्ये ऑकलंडमध्ये वेस्ट इंडिजने न्यूझीलंडविरुद्ध ३४५ धावांचे लक्ष्य गाठले होते.