Rohit Sharma Viral Video of IND vs NZ Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अटीतटीची लढत दिली आहे. पहिल्या डावात ४६ धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी आपल्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहेत. याच सामन्यातील कर्णधार रोहित शर्माचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात रोहित मैदानाकडे जाण्याचा रस्ता विसरल्याचे दिसत आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा गोष्टी विसरण्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याच्या या सवयीबद्दल त्याच्या टीम इंडियातील खेळाडूंनीही अनेकदा उल्लेख केला आहे. कधी तो त्याचा पासपोर्ट विसरतो, तर कधी हॉटेलमधून परतताना आपलं सामान विसरतो. आता बंगळुरू कसोटीतील रोहित शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो मैदानात जाताना रस्ता विसरलेला दिसत आहे. रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो समोरच्या मार्गाऐवजी साइड स्क्रीनच्या मागून मैदानात जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते म्हणत आहेत की, रोहित शर्मा रस्ता चुकला आहे, किंवा तो कोणत्या रस्त्याने जायचं आहे हे विसरला आहे.
हेही वाचा – IND vs NZ: भारतीय संघाने घडवला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
रोहित शर्माचा मजेशीर व्हीडिओ व्हायरल
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रोहित शर्मा ड्रेसिंग रूममधून बाहेर येतो आणि मैदानावर जाण्यासाठी साइड स्क्रीनच्या मागून एका अरुंद रस्त्याने मैदानात जात आहे. हे पाहून ऋषभ पंतही त्याच्या मागून येतो, पण तो रस्ता पाहून ऋषभ पंत मागे जातो आणि पुढील बाजूने मैदानात जाण्यासाठी जो रस्ता असतो, तिथून बाहेर पडतो. रोहित मात्र खूप वायर असलेल्या त्या रस्त्यानेच मैदानावर पोहोचतो. चाहते रोहितला पाहून रोहित रोहित आवाज देत होते, पण त्याला या रस्त्याने पाहताच चाहतेही हसू लागतात.
हेही वाचा – IND vs PAK: भारत-पाकिस्तानमध्ये आज होणार हायव्होल्टेज लढत, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार लाइव्ह?
भारत न्यूझीलंडमधील कसोटी सामन्यात पहिल्या डावात ४६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात जबरदस्त पुनरागमन केले आहे. भारतीय फलंदाजांनी आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने न्यूझीलंड संघाला धक्के दिले आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवण्यात आला असून लंच ब्रेकही झाला आहे. लंच ब्रेकपर्यंत भारताने सर्फराझ खानचे शतक आणि ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर ३ बाद ३४४ धावा केल्या आहेत. यासह भारतीय संघ आता फक्त १२ धावांनी मागे आहे.