सध्या राजकीय तणावामुळे भारत पाकिस्तान संघ द्विपक्षीय मालिका खेळत नसले, तरी जेव्हा-जेव्हा ते कोणत्याही स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येतात, तेव्हा खेळाडू आणि त्यांच्या समर्थकामंध्ये सौहार्दाचे संबंध दिसून येतात. असाच एक प्रकार दुबईत बघायला मिळाला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माने पाकिस्तानी चाहत्याची हस्तांदोलन करण्याची इच्छा पूर्ण केली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Asia Cup 2022 : आजपासून आशिया चषकाला सुरूवात; जाणून घ्या भारतात कुठे आणि किती वाजता बघता येतील सामने
आशिया चषकात उद्या भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध आहे. त्यापूर्वी भारतीय संघ कसून सराव करतो आहे. दरम्यान, काल रात्री भारतीय संघाचा सराव सुरू असताना मैदानाबाहेर अनेक पाकिस्तानी चाहते उभे होते. यावेळी एका चाहत्याने रोहीत शर्माला हस्तांदोलन करण्याची विनंती केली. या चाहत्याची विनंती मान्य करत रोहीतने सुरक्षेची परवा न करता, पाकिस्तानी चाहत्यासोबत हस्तांदोलन केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
खेळाडूंमध्ये एकमेकाविषयीचा आदर आणि कौतुक हा यंदाच्या आशिया चषकातला चर्चेचा मुद्दा बनला आहे. दुखापतीमुळे शाहीन शाह आफ्रिदी या स्पर्धेत खेळत नसला, तरी तो दुबईत संघाबरोबर आहे. काही दिवसांपूर्वी त्याने विराट कोहली, केएल राहुल, युझवेंद्र चहल आणि ऋषभ पंत यांची भेट घेतली. यावेळी त्याने कोहलीचा फॉर्म परत यावा, यासाठी प्रार्थना करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच कोहलीनेदेखील शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीची विचारपूस केली. तसेच दोघांनी हस्तांदोलनही केले.