IND vs SL Rohit Sharma: गुरूवारी मुंबईत होणार्या विश्वचषक २०२३ च्या सामन्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध विजयी होऊन सलग सातवा सामना आपल्या नावावर करता येणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला वानखेडेवर भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सचिन तेंडुलकरच्या भव्य दिव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सचिनच्या पुतळ्याबद्दल विचारले असता, कर्णधार रोहितने एक मजेशीर उत्तर दिले आहे.
सचिन तेंडुलकर कालच्या या सोहळ्याला पत्नी अंजली आणि मुलगी सारासह पोहोचला होता. तर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शहा, कोषाध्यक्ष आशिष शेलार, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे आदी मान्यवर सुद्धा उपस्थित होते.
सचिन तेंडुलकरचा पुतळा पाहिला का असे विचारला असता रोहित शर्मा म्हणाला की, “मुंबईत वानखेडेवर सरावासाठी गेल्यावर आम्ही हा पुतळा पाहिला पण जवळून पाहण्याची संधी मिळाली नाही त्यात आता आमच्या मीडिया मॅनेजरने पत्रकार परिषदेसाठी सुद्धा इतका उशीर केला. आता संधी मिळेल तेव्हा आम्ही नीट जवळून पुतळा बघू. पण जेवढं पाहिलंय त्यातून हेच एक कळत नाहीये की हा नेमका कोणता शॉट आहे. स्ट्रेट लॉफ्ट शॉटचा पुतळा बनवला असावा, चांगलं आहे, मला आशा आहे की तुम्हाला पण आवडला असेल.”
Rohit Sharma: “मी वाईट कर्णधार..”, रोहित शर्माने IND vs SL सामन्याआधी सांगितलं मनातील भीतीचं कारण
दुसरीकडे, पुतळा पाहून भारावून गेल्याचे सांगत सचिन तेंडुलकर म्हणाला की, “हा खरंच माझ्यासाठी एक खास क्षण आहे. फेब्रुवारीत शेलार आणि काळे यांनी एमसीएच्या वतीने मला कॉल केला, ते म्हणाले की तुमचा पुतळा स्टेडियममध्ये ठेवण्याचा विचार आमच्या मनात येत आहे. खरं सांगायचं तर मला खूप आनंद झाला. मला काय प्रतिक्रिया द्यायची हे कळत नव्हते, आज इथे उभं राहूनही मला खूप छान वाटत आहेत. आता माझ्या डोळ्यासमोर मैदानातील अनेक आठवणी, अनेक चेहरे समोर येत आहेत. या मैदानाने मला सगळं काही दिलं आहे आणि आता इथे उभं राहणं हा सुद्धा खूप मोठा सन्मान आहे.”