Pat Cummins reacts to Rohit Sharma’s advice: लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलिया हा आतापर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकणारा जागतिक क्रिकेटमधील पहिला संघ ठरला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघाने पाचही दिवशी शानदार कामगिरी केली. या सामन्यानंतर रोहित शर्माने आयसीसीला एक सल्ला दिला. त्यावर पॅट कमिन्सने प्रतिक्रिया दिली.
डब्ल्यूटीसी फायनल सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसीला एक सल्ला दिला. रोहित शर्मा म्हणाला, डब्लयूटीसीचा एक फायनल सामना खेळवण्याऐवजी आयसीसीने तीन सामन्यांच्या मालिकेद्वारे निकाल लावायला हवा. आता यावर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनी प्रतिक्रिया दिली आहे, जी खूप वेगाने व्हायरल होत आहे.
विजेता ठरवण्यासाठी एका सामन्याऐवजी तीन सामन्यांची मालिका –
या सामन्यातील पराभवानंतर पत्रकार परिषदेदरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, विजेता ठरवण्यासाठी एका सामन्याऐवजी तीन सामन्यांची मालिका करण्याचा निर्णय घेतला तर खूप चांगले होईल. त्यावर निर्णय होईल. दोन वर्षांच्या मेहनतीनंतर तुम्ही अंतिम फेरीत पोहोचता. पण ३ सामन्यांच्या मालिकेसाठी, त्यानुसार विंडो देखील पहावी लागेल.
ऑलिम्पिकमध्ये खेळाडू अंतिम फेरीत केवळ एकाच संधीत पदक जिंकतात –
रोहित शर्माच्या या उत्तरावर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला प्रश्न विचारला असता, तो म्हणाला की आम्ही आमच्या नावावर डब्ल्यूटीसीची गदा केली आहे. तीन सामन्यांची मालिका असो किंवा १६ सामन्यांची मालिका, याबाबत आम्हाला कोणतीही अडचण नाही. पण ऑलिम्पिकमध्ये खेळाडू अंतिम फेरीत केवळ एकाच संधीत पदक जिंकतात.
सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित केला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन्ही डावाच्या जोरावर भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात २३४ धावांवर गारद झाला.