भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली अवघ्या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये दुसरी आयसीसी ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. जून २०२४ मध्ये भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. तर भारताने हल्लीच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद आपल्या नावे केले. पण गेल्यावर्षी कसोटी कामगिरीत कर्णधार रोहित शर्माची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. त्यामुळे भारताचा कसोटी कर्णधार बदलणार का, अशा जोरदार चर्चा सुरू होत्या. पण बीसीसीआयकडून आलेल्या अपडेटनुसार रोहित शर्माच कर्णधार असल्याची माहिती समोर आली आहे.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दुबईत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल जिंकल्यानंतर लगेचच रोहित शर्मा जून-ऑगस्टमध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी कर्णधार राहील, अशी खात्री देण्यात आली आहे. एका महिन्यापूर्वी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या वेळी यापुढे भारताच्या कसोटी क्रिकेट नेतृत्त्व कोण करणार, या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
चॅम्पियन ट्रॉफीच्या विजयानंतर रोहित शर्माच्या कारकिर्दीत मोठे वळण आले आहे. इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, रोहित शर्माला आणखी एका मोठ्या दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि त्याच्या निवड समितीचा पाठिंबा मिळाला आहे.
रोहित शर्मावर कसोटी कर्णधार म्हणून इतका विश्वास का?
रोहित शर्माचं संघाचे नेतृत्त्व करणार हा निर्णय नक्की कधी घेण्यात आला? जेव्हा रोहित शर्मा त्याच्या जुन्या शैलीत फटेकबाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत होता तेव्हा? गेल्या दोन आयसीसी टूर्नामेंटमध्येही त्याने ही कामगिरी केली होती. कि जेव्हा तो त्याच्या फिरकीपटूंचा उत्तम वापर करत होता, तेव्हा हा निर्णय घेतला, की रोहित शर्मा आपल्या उत्कृष्ट नेतृत्त्वाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला भारतासमोर गुडघे टेकण्यासाठी भाग पाडत होता, तेव्हा…. काय आहेत नेमकी कारणं, जाणून घेऊया.
भारताकडे सलामीवीर म्हणून अनेक पर्याय पण…
याचे कारण म्हणजे भारताकडे यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन आणि केएल राहुलसारखे अनेक सलामीवीर फलंदाजीचे पर्याय आहेत, पण कर्णधार रोहितसारखे धोरणात्मक कौशल्य कोणाकडे नाही. त्याच्याकडे संयम आहे, जो आधुनिक काळातील आताच्या क्रिकेट कर्णधारांमध्ये ही एक दुर्मिळ गुणवत्ता आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कठीण काळात वेटिंग गेम खेळण्याची एक कला त्याच्यात आहे.
इंग्लंडमध्ये खेळताना कर्णधारांना चिकाटीने खेळण्याची आवश्यकता आहे. कर्णधार असा असावा की ज्याच्यामध्ये दृढ विश्वास असेल, संघाच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी घडत नसतानाही जो आपल्या खेळाडूंना जीव ओतून खेळण्यास तयार करू शकेल. जुन्या रेकॉर्ड्सप्रमाणे स्विंग बॉलिंग ही एकमेव गोष्ट इंग्लंडमध्ये चालत नाही, ज्यामुळे अनेक विकेट पडत राहतात. या खेळपट्ट्यांवर फलंदाजांनी सुरूवातीच्या स्पेल खेळून काढल्यानंतर मोठ्या भागीदारी रचू शकतात.
डॅडी हंड्रेड्स (मोठ्या शतकी खेळी) हा शब्दप्रयोग इंग्लंडमधील दिग्गज फलंदाज ग्रॅहम गूचने तयार केला होता. ग्रॅहम त्यांच्या कारकिर्दीत खेळताना मोठमोठ्या शतकी खेळी करायचे. जेव्हा ते इंग्लंडचे फलंदाजी प्रशिक्षक बनले, तेव्हा त्यांचा कर्णधार ॲलिस्टर कुकने कमांड घेतली आणि धावांची मॅरेथॉन सुरू केली. दुर्दैवाने या दोन्ही दिग्गजांच्या हातून भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
आणखी एक इंग्रजी म्हण आहे, जी वेगवेगळ्या देशांतील क्रिकेटची माहिती देते. आपण बससाठी खूप वेळ वाट पाहत असतो आणि नंतर दोन किंवा अधिक बस एकाच वेळी येतात. विकेट कधीकधी एकत्र येतात, परंतु जेव्हा कर्णधार संघासाठी अथक परिश्रम करण्यास तयार असतो तेव्हाच. ते खेळ हाताबाहेर जाऊ देऊ शकत नाहीत.
सर्वोत्तम खेळाडूही कठीण काळात अपयशी ठरले आहेत. त्यांनी पराभव स्वीकारला. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील अनुभवी कर्णधार एमएस धोनीही अनेकदा इंग्लंडमधील कसोटी सामन्यांमध्ये अपयशी ठरलेला दिसला होता. इंग्लंडमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताला १५ पैकी १३ कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
२०११ च्या मालिकेत भारताने चारही कसोटी गमावल्या होत्या. यावेळी संघाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संघ फलंदाजी करत असताना धोनी एक झोप घेत असे. मैदानावरही जेव्हा कसोटी हातातून निसटू लागली तेव्हाही तो फार काही करू शकला नाही. अती आक्रमकतेने खेळणंही इंग्लंडमध्ये चालत नाही. २०१८ मध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा १-४ असा पराभव झाला. मात्र नंतर कोहलीने २-१ अशी आघाडी घेतली. पण वर्षभरानंतर पुढे ढकलण्यात आलेली कसोटी जिंकून इंग्लंडने मालिका बरोबरीत आणली. त्यावेळेस रोहित शर्मा संघाचा कर्णधार होता. मात्र त्या सामन्यात जसप्रीत बुमराहने संघाची कमान सांभाळली.
भारताने इंग्लंडमध्ये अखेरची कसोटी मालिका कधी जिंकली होती?
भारतीय संघाने इंग्लंडमध्ये शेवटची मालिका २००७ मध्ये जिंकली होती. जेव्हा संघाचे कर्णधारपद राहुल द्रविड यांच्याकडे होते. द वॉल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटपटूच्या चिकाटीबद्दल फार काही सांगण्याची गरज नाही. या संघात भारताचे महान कसोटीपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि झहीर खान यांचा समावेश होता. पुढे भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जिंकला, पण इंग्लंड दीड दशकांहून अधिक काळ अपराजित राहिला आहे. आता रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संघातही विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि केएल राहुलसारखे चांगले कसोटीपटू आहेत.
द्रविडप्रमाणेच रोहितही कर्णधार असताना त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसून येतात. रोहित द्रविडपेक्षा चांगला खेळाडूंना चांगलं मॅनेज करतो. २०२४ मध्ये भारताकडून झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून इंग्लंड अजून खचत चालला आहे. कसोटीत बॅझबॉल खेळायचा की नाही या संभ्रमात संघ आहे. अशा स्थितीत भारतीय संघ बाजी मारेल का यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.