Harbhajan Singh On Rohit Sharma: माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगला असे वाटत आहे की आगामी काळात रोहित शर्माला भारतीय क्रिकेट व्यवस्थेकडून पूर्ण पाठिंबा आवश्यक आहे कारण लोक त्याच्या कर्णधारपदावर खूप टीका करत आहेत. अलीकडे, भारतीय कर्णधाराला महान सुनील गावसकर यांच्यासह चाहते आणि माजी क्रिकेटपटूंकडून खूप टीकेला सामोरे जावे लागले आहे. “त्याच्यावर टीका करताना लोकानी मर्यादा ओलांडली आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे भारताचे पुन्हा एकदा आयसीसी विजेतेपदापासून वंचित राहिले. भारतीय संघाने २०१३ मध्ये शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. फायनलमधील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा टीकाकारांच्या निशाण्यावर आहे.

लोकांनी खूप मर्यादा ओलांडल्या- भज्जी

या कठीण काळात भज्जीची म्हणजेच रोहित शर्माला टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगची साथ लाभली आहे. लोक त्याच्या कर्णधारपदावर टीका करत असल्याने येत्या काही महिन्यांत रोहित शर्माला त्याच्या पाठिंब्याची गरज भासेल, असा विश्वास हरभजन सिंगला वाटतो. हरभजनने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “मला वाटते की लोकांनी ज्या प्रकारे रोहितवर टीका केली आहे, त्यातून दिसून येते की त्यांनी खूप मर्यादा ओलांडली आहे. आजकाल सोशल मीडियाचा काळ असल्याने इतक्या खालच्या स्तरावर जाऊन लोक त्याच्यावर टीका करत आहेत. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि त्यासाठी एका व्यक्तीला जबाबदार धरणे योग्य नाही.”

हेही वाचा: IND vs WI: “टेस्टलाही बनवली आयपीएलची…”; BCCIने केली वेस्ट इंडीज मालिकेपूर्वी टीम इंडियाची जर्सी लॉन्च, चाहत्यांनी केले ट्रोल

कसोटी क्रिकेटमध्ये ४१७ विकेट्स घेणारा हरभजन म्हणतो, “टीम इंडियाने WTC फायनलमध्ये चांगली कामगिरी केली नाही. तुम्ही त्या कामगिरीबद्दल बोला आणि तिथून पुढे जा. एकट्या रोहितवर टीका करणे अयोग्य आहे. म्हणे तो धावा काढत नाही, वजन कमी करत नाही, कॅप्टन्सीही नीट नाही. माझ्या मते तो एक उत्कृष्ट कर्णधार आहे. ज्यांना साधी बॅट हातात धरता येत नाही आजकाल ते सुद्धा रोहितवर खालच्या स्तरावर टीका करत आहेत.”

रोहितला ड्रेसिंग रुममध्ये खूप मान-सन्मान मिळतो- भज्जी

४३ वर्षीय हरभजन पुढे म्हणाला, “मी त्याच्यासोबत (रोहित) खूप क्रिकेट खेळलो आहे आणि त्याला जवळून पाहिले आहे. त्याला फक्त मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्येच नाही, भारतीय ड्रेसिंग रूममध्येही खूप आदर मिळतो. त्यामुळे अलीकडच्या निकालांच्या आधारे त्याचा न्याय करणे अयोग्य आहे असे मला वाटते. तो चांगली कामगिरी करेल आणि आपण त्याच्यावर विश्वास दाखवला पाहिजे. आपण त्यांचे समर्थन केले पाहिजे आणि टीका करून ट्रोल करू नये.”

“रोहित शर्माला माजी कर्णधारांप्रमाणे बीसीसीआयकडून पाठिंबा मिळेल”, अशी आशा हरभजनने व्यक्त केली. भज्जी पुढे म्हणाला, “जर तुम्हाला बीसीसीआयचा पाठिंबा असेल तर तुम्ही स्वतंत्रपणे काम करू शकता. फक्त एम.एस. धोनी किंवा विराट कोहलीच नाही. जर थोडं मागे गेलं तर अनेक कर्णधारांना बीसीसीआयच्या त्या काळातील अध्यक्षांचा पाठिंबा मिळाला. मात्र, आताच्या काळात मला माहित नाही की त्याला किती पाठिंबा मिळेल? असा पाठिंबा मिळाल्याने त्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.”

हेही वाचा: IND vs WI: रिपोर्टर रोहित शर्मा! रहाणेच्या पत्रकार परिषदेत घुसखोरी करत विचारले प्रश्न, हिटमॅनचा ‘हा’ खास Video व्हायरल

रोहित शर्मा सध्या भारतीय संघासोबत विंडीज दौऱ्यावर आहे, जिथे तो कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहितला टी२० संघात स्थान मिळालेले नाही. टी२० संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे असेल. भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी२० सामने खेळायचे आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma harbhajans befitting reply to those who criticized rohit sharma created panic with his statement avw