भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना गुरुवारपासून खेळला जातोय. हा सामना नागपुरात होत आहे. कर्णधार रोहित शर्माला या कसोटी मालिकेत इतिहास रचण्याची संधी आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली बॉर्डर गावसकर ट्रॉफीनंतर, टीम इंडियाला आयसीसी कसोटी क्रमवारीतही पहिले स्थान मिळवता आले, तर तो जगातील पहिला कर्णधार ठरेल. ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने तिन्ही फॉरमॅट पहिला क्रमांक मिळवला.
भारत सध्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे, तर टीम इंडिया वनडे आणि टी-२० मध्ये पहिल्या स्थानावर आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाला किती फरकाने पराभूत करावे लागेल ते जाणून घेऊया. कारण ही मालिका भारताच्या दृष्टीने अनेक प्रकारे महत्वाची असणार आहे.
जर रोहित शर्माच्या संघाला कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान मिळवायचे असेल, तर त्यांना बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला किमान २-० ने पराभूत करावे लागेल. याशिवाय ऑस्ट्रेलियन संघ एका सामन्यात जिंकला, तर भारताला ही मालिका ३-१ अशी जिंकावी लागेल. टीम इंडियाने हे यश मिळवले तर कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थान गाठेल.
कसोटी क्रमवारीबरोबरच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीवर लक्ष –
कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्यासोबतच, भारताची नजर सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्याकडे असेल. डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारत सध्या ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. भारताला अंतिम फेरी गाठायची असेल तर किमान दोन सामने जिंकावे लागतील.
हेही वाचा – WTC Final 2023: आयसीसीकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल मोठी अपडेट; ‘या’ तारखेला खेळला जाणार अंतिम सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात २२ षटकानंतर २ बाद ५० धावा केल्या. डेव्हिड वार्नर आणि उस्मान ख्वाजा प्रत्येकी १ धावांवर बाद झाल्याने ऑस्ट्रेलिया मोठा धक्का बसला आहे. भारताकडून मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.