Rohit Sharma completes 13,000 runs as opener: लंडनमधील ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघांत डब्ल्यूटीसी फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ४४४ धावांचे लक्ष्य दिले. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने ४३ धावांचे योगदान दिले. त्याचे सात धावांनी अर्धशतक हुकले, परंतु त्याने या धावांच्या जोरावर एक खास कामगिरी केली आहे. त्याने सलामीवीर फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३,००० धावा पूर्ण केल्या.
रोहित शर्मा तेरा हजार धावांचा टप्पा गाठणारा तिसरा भारतीय सलामीवीर ठरला. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी ही कामगिरी केली आहे. त्याच्यापेक्षा फक्त मॅथ्यू हेडन (२९३ डाव) आणि सचिन तेंडुलकर (२९५ डाव) यांनी हा टप्पा गाठला आहे.रोहित शर्माने ३०७ व्या डावात ही कामगिरी केली.
पहिल्या डावात १५ धावांवर बाद झाल्यानंतर रोहितने अंतिम फेरीच्या दुसऱ्या डावात ही कामगिरी केली. सचिन तेंडुलकरने सलामीवीर म्हणून १५,३३५ धावा केल्या. वीरेंद्र सेहवागने १५,७५८ धावा केल्या आहेत. रोहितने २०१३ मध्ये कसोटी पदार्पण केले असले, तरी २०१९ मध्ये तो सलामीवीर बनला. कसोटी सलामीवीर म्हणून पहिल्या सामन्यात रोहितने विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही डावात शतके झळकावली होती.
हेही वाचा – IND vs AUS: मोहम्मद सिराजच्या वेगवान माऱ्यामुळं मार्नस लाबुशेन झाला जखमी, पाहा VIDEO
सलामीवीर म्हणून रोहित शर्माचा विक्रम –
रोहित हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे, त्याने सहा शतके आणि चार अर्धशतकांच्या मदतीने १८०० हून अधिक धावा केल्या आहेत. तेंडुलकरनंतर, सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००००, ११००० आणि १२०० धावा करणारा रोहित दुसरा सर्वात वेगवान फलंदाज होता. रोहित शर्माने सलामीवीर म्हणून कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये एकूण ३८ शतके झळकावली आहेत. त्याने कसोटीमध्ये ६, टी-२०मध्ये ४ आणि वनडे १८ शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने ५९ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने वनडेमध्ये ३५ अर्धशतके, टी-२०मध्ये २४ आणि कसोटीत ४ अर्धशतके केली आहेत.