Rohit Sharma India Captain: धरमशाला कसोटीमध्ये भारतीय संघाने आपली पकड मजबूत ठेवली आहे. पण याचदरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावासाठी संपूर्ण संघ क्षेत्ररक्षणासाठी उतरला पण भारताचा कर्णधार रोहित शर्मा मैदानात उतरला नाही. शनिवारी भारतीय संघाचा पहिला डाव संपल्यानंतर बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट करून ही माहिती दिली. पाठदुखीचा त्रास होत असल्याने रोहित क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आलेला नाही. त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमराह संघाचं नेतृत्व करत आहे. रोहित शर्मा किती काळ मैदानाबाहेर राहणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
इंग्लंडविरूध्दच्या कसोटीसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर संघाची कमान असेल. म्हणजेच जोपर्यंत रोहित शर्मा मैदानात येत नाही तोपर्यंत बुमराह संघाचे नेतृत्व करेल.बुमराहला रांची कसोटीतून विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळेच अश्विन त्या सामन्यात संघाचा उपकर्णधार होता.रांची कसोटीतही जेव्हा रोहित एक-दोन षटके टाकून बाहेर मैदानाबाहेरगेला तेव्हा अश्विनने संघाची कमान सांभाळली.
भारतीय संघाने पाचव्या कसोटीवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. या सामन्यात प्रथम खेळताना इंग्लंडचा संघ २१८ धावांत आटोपला. प्रत्युत्तरात भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलची शतके आणि यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिककल आणि सरफराज खान यांच्या उत्कृष्ट अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाने मोठी आघाडी घेतली. अखेरीस कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे भारताने ४७७ धावा केल्या. भारताची एकूण आघाडी २५९ धावांची होती. दुसऱ्या डावात खेळायला आलेल्या इंग्लंडने ९५ धावांत ४ गडी गमावले आहेत.