Rohit Sharma on Rahul Dravid: भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी येणारे दोन महिने खूप महत्त्वाचे आहेत. टीम इंडिया सध्या रोहितच्या नेतृत्वाखाली आशिया कप खेळत आहे. यानंतर टीम इंडियाला ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये सहभागी व्हायचे आहे. हिटमॅनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला या दोन्ही ट्रॉफी जिंकायच्या आहेत.
सर्व क्रिकेट चाहत्यांना माहीत आहे की, कोणत्याही महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी ड्रेसिंग रूममधील वातावरण संघाच्या कामगिरीमध्ये मोठी भूमिका बजावते. अलीकडे, एका मुलाखतीदरम्यान, भारतीय कर्णधाराने त्याच्या आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय ड्रेसिंग रूममधील वातावरणाबद्दल भाष्य केलं आहे. द्रविडला संघात कोणत्याही प्रकारचा गैरसमज नको आहे, असा खुलासाही त्याने केला.
रोहित शर्माने राहुल द्रविडसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल सांगितले
विमल कुमारच्या यूट्यूब चॅनलवर रोहित शर्मा म्हणाला, “राहुल भाईचा आणि माझा क्रिकेटमध्ये संबंध हा खूप जुना आहे. ज्यावेळी राहुल भाई टीम इंडियात खेळत होता तेव्हापासून मी त्यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करत आलो आहे. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे, सर्व प्रथम ते एक माणूस आहेत आणि नंतर स्पष्टपणे एक क्रिकेटर आहेत. त्यांना खेळाडू, सपोर्ट स्टाफ किंवा इतर कोणामध्येही कुठल्याही बाबतीत कोणताही गैरसमज नको असतो. जे सांगितलं आहे ते झालच पाहिजे असा त्यांचा नियम आहे. त्यांचा मुख्य नियम असा आहे की, काहीही चांगले किंवा वाईट झाले तरी संबंधित व्यक्तीला सांगितले गेलेच पाहिजे. आमचे नाते खुले आहे, आम्ही आमच्यात कुठलाही आडपरदा ठेवला नाही. ते नेहमी खेळाडूंबद्दल बोलत राहतात. मी त्यांच्याबरोबर खूप वेळ एन्जॉय केला आहे.”
विराट कोहलीसोबतच्या नात्यावर बोलताना रोहित शर्माने बरंच काही सांगितलं. तो म्हणाला, “आम्ही जेव्हा क्रिझवर एकत्र असतो तेव्हा कोण गोलंदाजी करत आहे यावर चर्चा करतो आणि त्याला सामोरे जाण्यासाठी योजना बनवतो. आम्ही सहसा प्रत्येक मालिकेपूर्वी आगामी आव्हानांबद्दल चर्चा करत असतो आणि युवा खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवतो.”
दरम्यान, भारताने नेपाळला त्यांच्या दुसऱ्या गट सामन्यात दहा गडी राखून पराभूत करून आशिया चषक २०२३च्या सुपर-४ टप्प्यासाठी पात्र ठरले. मेन इन ब्लू त्यांचा पहिला सुपर-४ सामना रविवार, १० सप्टेंबर रोजी आर.जे. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल. उभय संघांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.