बीसीसीआयने बुधवारी टीम इंडियाचा नवा वनडे कर्णधार म्हणून रोहित शर्माची नियुक्ती केली. टी-२० क्रिकेटमध्ये पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर त्याने चांगली सुरुवात केली. टी-२० विश्वचषकातील पराभवाचा बदला घेत, त्याने टी-२० मालिकेत न्यूझीलंडचा ३-० असा पराभव केला. पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून रोहित वनडे कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी आयसीसी स्पर्धांमध्ये भारताच्या कामगिरीबद्दल बोलताना त्याने पराभवाची कारणे ओळखली.
रोहितने आयसीसीच्या तीन स्पर्धांमध्ये भारतीय संघाच्या पराभवावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या तिन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना का करावा लागला हे रोहितने सांगितले. त्याच्या म्हणण्यानुसार, भारतीय संघाच्या या तीनही पराभवांमध्ये एक गोष्ट समान होती. एक्स्ट्रा टाईममधील संवादादरम्यान तो म्हणाला, ”चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१९ विश्वचषक आणि या विश्वचषकातही आम्ही सुरुवातीच्या टप्प्यात सामने गमावले. आम्ही सुरुवातीला लवकर विकेट गमावल्या आणि त्यामुळेच आम्ही हरलो. ही गोष्ट मी नंतर लक्षात ठेवेन. मला आशा आहे की अशी चूक चौथ्यांदा होणार नाही. आपल्याला सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल. १० धावांवर तीन विकेट पडतील अशा परिस्थितीसाठी आम्हाला तयार राहावे लागेल. अशा प्रकारे मला संघाला पुढे न्यायचे आहे. जर तुम्ही १० धावांत ३ विकेट गमावल्या तर तुम्ही १८० किंवा १९० करू शकत नाही असे कुठेही लिहिलेले नाही. या तिन्ही आयसीसी स्पर्धांमध्ये एकच गोष्ट समान होती, की आम्ही लवकर विकेट गमावल्या.”
गेल्या तीन आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला आहे. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच वेळी, २०१९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत, संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला आणि २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे या तिन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता.