Rohit Sharma on Rajat Patidar: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना रोहित शर्माने अनेकवेळा आढेवेढे न घेता स्पष्ट उत्तरे दिली आहेत, मग तो मुद्दा कोणताही असो. न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकून आणि वन डे क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवल्यानंतर रोहित शर्माने मीडियाशी संवाद साधला तेव्हा रजत पाटीदारबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागी अखेरच्या क्षणी रजतचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला होता पण त्याला संधी मिळाली नाही.
भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर जखमी झाला होता. त्यांच्या जागी रजत पाटीदारचा संघात समावेश करण्यात आला. पण या मालिकेत रजत पाटीदार किंवा केएस भरत या दोघांनाही संधी मिळाली नाही. इंदोरमध्ये रोहित शर्माकडून रजत पाटीदारला संधी का मिळाली नाही, असे विचारले असता, रोहित शर्माने अशा प्रश्नाचे सडेतोड उत्तर दिले.
रोहित शर्मा म्हणाला, “सर जेव्हा जागा असेल तेव्हा आम्ही त्याला खाऊ घालू. तिसर्या क्रमांकावर विराट कोहली, चौथ्या क्रमांकावर इशान किशन आहे, जो द्विशतक ठोकूनही बाहेर बसला आहे. सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर आहे आणि संपूर्ण जगाला माहिती आहे. की तो काय करतोय. तिथे हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जागा असली पाहिजे.”
रोहित पुढे म्हणाला, “आम्हाला सगळ्यांनी खेळावं असं वाटतं पण जागा मात्र ११ खेळाडूंची असल्याने सर्वांना संघात स्थान देणे शक्य होणार नाही. मला माहीत आहे की आम्ही त्याला (रजत) इंदोरमध्ये खायला द्यायला हवं होतं. रांची, झारखंडमध्ये इशान किशन भी बोलेगा “मुझे भी खिलाओ यार.” मी इथला म्हणजेच रांचीचा आहे, असे होत नाही. आमची योजना आहे, खेळाडूंना संधी मिळेल, अनेकजण संधीची वाट पाहत आहेत.”
विशेष म्हणजे रजत पाटीदारचा यापूर्वी गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला होता. पण त्याला संधी मिळाली नाही. बांगलादेश दौऱ्यानंतर रजत पाटीदारला संघातून वगळण्यात आले होते. आता तो न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेचा भाग आहे जिथे त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.