Rohit Sharma’s first match abroad as Test captain: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत आजपासून (७ जून) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा पहिल्यांदाच भारताबाहेर कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्त्व करताना दिसत आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने भारतात शानदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भारताबाहेरही रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० आणि वनडेत शानदार दमदार प्रदर्शन केले आहे. परंतु त्याच्या नेतृत्वाखाली भारताने विदेशात एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाची विदेशातील कामगिरी –

२०१८ सालापासून भारतीय संघाने रोहितच्या नेतृत्वाखाली भारताबाहेर ३९ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एकदिवसीय आणि टी-२० चा समावेश आहे. भारताने ३९ पैकी २६ सामने जिंकले असून १३ सामने गमावले आहेत. रोहित प्रथमच घरापासून दूर कसोटी सामन्यात कर्णधार आहे. अशा स्थितीत कांगारूंविरुद्धची ही फायनल रोहितसाठी आणखी आव्हानात्मक बनली आहे. खडतर खेळपट्टीच्या परिस्थितीसोबतच रोहितवर भारताबाहेरच्या पहिल्या कसोटीत कर्णधारपदाचेही दडपण असेल.

हेही वाचा – IND vs AUS, WTC 2023 Final: तीन विकेट्स घेताच आश्विन रचणार इतिहास, हरभजन आणि कुंबळेच्या ‘या’ खास क्लबमध्ये होणार सामील

रोहितने आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले असून तो यशस्वीही ठरला आहे. संघाने भारतामध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली सहा कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने चार सामने जिंकले आहेत आणि प्रत्येकी एका सामन्यात पराभव आणि अनिर्णित सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे भारताने गमावलेला एकमेव सामना आणि अनिर्णित राहिलेला सामनाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला होता. रोहितच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहापैकी चार सामने खेळले गेले आहेत. हे सर्व सामने २०२३ साली बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळवण्यात आले होते.

कर्णधार म्हणून रोहितची कामगिरी कशी आहे?

रोहित शर्माने आतापर्यंत ८३ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी भारताने ६२ सामने जिंकले आहेत, तर २० सामने गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. २०१७ मध्ये रोहित शर्मा पहिल्यांदाच भारतीय संघाचा कर्णधार बनला आणि टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, त्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने पुढील २० पैकी १८ सामने जिंकले. आता त्याला त्याच्या नेतृत्वाखाली भारताची पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकायची आहे.

Story img Loader