Yuvraj Singh on Rohit Sharma: एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरू होण्यास २ महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. यंदाचा विश्वचषकाचे यजमानपद हे भारताला मिळाले असून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवला जाणार आहे. विश्वचषकापूर्वी तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंनी आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे. यात भारताचा माजी स्टार डावखुरा फलंदाज युवराज सिंगचाही सहभाग होता. २०११च्या विश्वचषकात भारतीय संघाचा भाग असलेल्या युवराजने भारताचा कर्णधार रोहित शर्माबद्दल बोलताना बीसीसीआयकडे अनोखी मागणी केली.
‘इंद्रनील बासू’शी बोलताना माजी खेळाडू युवराज सिंग म्हणाला की, “रोहित शर्मा चांगला कर्णधार आहे, पण तुम्हाला त्याला चांगली टीम द्यायची आहे.” २०११मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधाराबद्दल युवराज म्हणाला की, “एम.एस. धोनी हा देखील चांगला कर्णधार होता, पण त्याच्याकडे अनुभवी खेळाडूंसह एक चांगली टीमही होती. २०११च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, हरभजन सिंग असे अनेक स्टार खेळाडू होते.”
पुढे युवी म्हणाला की, “मात्र, सध्या टीम इंडियाकडे मोहम्मद शमी, के.एल. राहुल आणि जसप्रीत बुमराहसारखे काही खेळाडू आहेत, जे २०१९च्या विश्वचषकात टीम इंडियाचा भाग होते. याशिवाय संघात अनेक युवा खेळाडू आहेत ज्यांच्याकडे एकहाती सामना जिंकण्याची क्षमता आहे. भारतीय संघ जरी गेल्या काही काळापासून के.एल. राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयससारख्या खेळाडूंशिवाय खेळत असला तरी, हे खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. त्यामुळे जरी ते संघात जरी परतले तरी त्यांच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह कायम राहील.” जसप्रीत बुमराहचे संघात आयर्लंड दौऱ्यावर पुनरागमन झाले आहे मात्र, विश्वचषकापर्यंत इतर खेळाडूंच्या बाबतीत कुठलीच अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. विश्वचषकापर्यंत पुनरागमनाबद्दल या खेळाडूंची अटकळ बांधली जात आहे.
रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे कौतुक करताना युवराज पुढे म्हणाला, “मला वाटते की रोहित खूप चांगला कर्णधार बनला आहे कारण त्याने आयपीएलमध्ये दीर्घकाळ मुंबईचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्याला दडपणाखाली खेळण्याची सवय असून तो उत्तम प्रकारे ते हाताळू शकतो, तो खूप समजूतदार माणूस आहे. तुम्हाला अनुभवी कर्णधाराला एक चांगला संघ देण्याची गरज आहे. एम.एस. धोनी चांगला कर्णधार होता, पण त्यालाही चांगली टीम मिळाली होती.”
एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे सुधारित वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गुरुवारी जाहीर केले आहे. यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सह नऊ सामन्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. विश्वचषकाची तिकिटे २५ ऑगस्टपासून विक्रीसाठी ठेवली जातील. ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मागच्या विश्वचषकातील अंतिम फेरीतील इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ एकमेकांशी भिडतील आणि स्पर्धेला सुरुवात होईल.