Gautam Gambhir on Rohit Sharma: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या नेतृत्व गुणाचे कौतुक केले आहे. “तो खेळाडूंना किती जपतो आणि कुठलाही दबाव टाकत नाही  रोहित यावरून चांगला कर्णधार ओळखला जातो,” असे गंभीर म्हणाला. केवळ या विश्वचषकातच नाही तर रोहितच्या बाजूने हे नेहमीच दिसून आले आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपले सर्व ९ साखळी सामने जिंकून पहिल्या क्रमांकावर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहितने मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाखाली पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, एमआय पलटणने २०१३ मध्ये आता बंद झालेली चॅम्पियन्स लीग टी२० स्पर्धा देखील जिंकली आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात, रोहितने फलंदाजी आणि नेतृत्व कौशल्याने चमकदार कामगिरी केली आहे कारण, भारत साखळी टप्प्यात अपराजित राहिला आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्याआधी टीम इंडियाने सलग नऊ सामने जिंकले. भारताचा आता बाद फेरीचा सामना हा बुधवारी न्यूझीलंडशी होईल.

गौतम गंभीरने रोहित शर्माचे कौतुक केले

गंभीरने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “एक चांगला कर्णधार आणि नेता तुम्हाला सुरक्षा देतो, ज्यामुळे ड्रेसिंग रूम केवळ त्याच्यासाठीच नाही तर इतर १४ खेळाडूंसाठीही सुरक्षित होते आणि दबाव कमी करते. रोहित शर्माने नेमके हेच केले आहे.” तो पुढे म्हणाला, “म्हणूनच त्याने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. जेव्हा त्याने हे सर्व आंतरराष्ट्रीय सामने खेळायला सुरुवात केली तेव्हा त्याचे विजयाचे प्रमाण विलक्षण होते. तुम्ही आकडेवारी आणि ट्रॉफी पाहिल्यास, तो सर्व बॉक्सवर टिक करत आहे. त्याने टीम इंडियातील जवळपास सर्व उणीवांवर मात केली आहे. त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने त्या ड्रेसिंग रूममध्ये अतिशय खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले आहे. यामुळेच तो भारताच्या इतर कर्णधारांपेक्षा खूप वेगळा आहे.”

पॉवरप्लेमध्ये रोहितची आक्रमक वृत्ती ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला आवडते. फिंच म्हणाला, “रोहितने संघाला वेगवान सुरुवात देण्याचा प्रयत्न केला आहे. स्पर्धा जसजशी पुढे सरकत गेली तसतशी विकेट संथ होत गेली हे तुम्ही पाहिले असेल. अशा परिस्थितीत, सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये विरोधी संघावर दबाव आणणे खरोखरच महत्त्वाचे होते आणि तेच रोहितने केले.”

सामन्यानंतर भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे म्हणाले की, “कोहली, गिल, सूर्या आणि रोहित यांनी नेदरलँडविरुद्ध गोलंदाजी करणे हा योगायोग नव्हता. प्रत्यक्षात दोन वर्षांपासून यासाठीचे नियोजन सुरू होते. त्याने सांगितले की विराट कोहलीचे चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी इनस्विंग होत आत येतात. फलंदाजाने एखादी चूक केल्यास विराटला विकेट मिळू शकते.”

हेही वाचा: Pakistan Cricket: विश्वचषकातून बाहेर पडलेल्या पाकिस्तानला मोठा धक्का! गोलंदाजी प्रशिक्षकाने सोडली संघाची साथ

पुढे पारस म्हणाले, “पॉवरप्लेमध्ये विराट काही षटके टाकेल अशी योजना आहे आणि या सामन्यात त्याने मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी करून विकेट घेतली. त्याने योग्य नियोजनासह गोलंदाजी केली. शेवटच्या षटकांमध्येही तसा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याच वेळी, सूर्यकुमार आणि गिलची ऑफ-स्पिन गोलंदाजी मधल्या षटकांमध्ये उपयुक्त ठरू शकते. रोहित त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगला ऑफस्पिनर म्हणून गोलंदाजी करत होता आणि तो आताही गोलंदाजी करू शकतो.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma is different from other captains of india gautam gambhir gave a big statement before the semi finals avw