Rohit Sharma Set to join team in Perth Test: २२ नोव्हेंबरपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरूवात होत आहे आणि पहिलाच सामना पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करेल. रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. पण आता रोहित पुन्हा भारतीय संघात कधी दाखल होणार, याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार, रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे टीम इंडियासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकला नाही आणि पहिल्या कसोटी सामन्यासाठीही तो उपलब्धही नाही. याबाबतची माहिती त्याने पूर्वीच बीसीसीआयला दिली होती. पण आता पर्थ कसोटी सामना सुरू असतानाच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा संघात सामील होईल. क्रिकबझनुसार, भारतीय कर्णधार रोहित शर्मा २४ नोव्हेंबरला भारतीय संघात सहभागी होणार आहे.
१५ नोव्हेंबरला रोहितची पत्नी रितिका हिने मुलाला जन्म दिला आणि आता सर्व काही ठीक झाल्यानंतर रोहित शर्माने भारतीय संघात येण्याचा निर्णय घेतला आहे. २०१८ मध्ये रोहित शर्माच्या पहिल्या मुलीचा म्हणजेच समायराचा जन्म झाला तेव्हाही रोहित शर्मा ऑस्ट्रेलियामध्ये सामना खेळत होता.
रोहित शर्मा पर्थ कसोटी सामना सुरू असतानाच संघात सहभागी होईल आणि त्यानंतर तो दुसऱ्या कसोटी सामन्यापासून संघाचे नेतृत्त्वाची जबाबदारी स्वीकारेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना डे नाईट टेस्ट असेल. भारतीय क्रिकेट संघ १० आणि ११ नोव्हेंबरला दोन बॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. पण रोहित मात्र मुंबईतच होता. पण रोहित शर्माने आता बीसीसीआयला कळवले आहे की, तो २४ नोव्हेंबर म्हणजेच रविवारी पर्थमध्ये भारतीय संघात सामील होणार आहे; असे वृत्त क्रिकबझने दिले आहे.
हेही वाचा – IND vs AUS: रिंकू सिंगचे ५ चेंडूत ५ षटकार खाल्लेल्या गोलंदाजाला मिळाली ऑस्ट्रेलियावारीची संधी
ब
टीम इंडियाने याआधी ऑस्ट्रेलियामध्ये सलग दोनदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे आणि आता सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात रोहित शर्माच्या जागी देवदत्त पडिक्कलचा समावेश करण्यात आला आहे. २४ नोव्हेंबरला संघात सामील झाल्यानंतर रोहित शर्मा ३० नोव्हेंबरपासून मिनिस्टर इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यातही खेळणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd