वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार हे निश्चित झाल्यापासून तेथील ‘ड्रॉप इन’ खेळपट्टय़ांबाबत बरीच चर्चा रंगत होती. आता या स्पर्धेला सुरुवात होऊन तीन-चार दिवस झाले असले, तरी अमेरिकेतील खेळपट्टय़ांबाबत संभ्रम कायम आहे. या खेळपट्टय़ांचा अंदाज बांधणे अवघड असल्याचे मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने आर्यलडविरुद्धच्या सामन्यानंतर व्यक्त केले. तसेच इरफान पठाण, वसीम जाफर आणि मायकल वॉन यांसारख्या माजी क्रिकेटपटूंकडूनही न्यूयॉर्क येथील खेळपट्टीवर टीका करण्यात आली.

भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेची यशस्वी सुरुवात करताना आर्यलडवर आठ गडी राखून मात केली. मात्र, या सामन्यापेक्षा, त्यात वापरण्यात आलेल्या खेळपट्टीबाबत अधिक चर्चा रंगली. अतिरिक्त उसळी आणि बऱ्याच भेगा असलेल्या या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अत्यंत अवघड होते. फलंदाजीदरम्यान रोहितच्या खांद्याला चेंडू लागला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. तसेच ऋषभ पंतच्याही कोपराला चेंडू लागला. या अवघड खेळपट्टीवर आर्यलडच्या फलंदाजांचा भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. आर्यलडचा डाव १६ षटकांत अवघ्या ९६ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर भारताला विजयी लक्ष्य गाठण्यासाठी १२.२ षटके खेळावी लागली.

हेही वाचा >>>Pak vs USA: पाकिस्तानचं पानिपत; सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेकडून पराभवाची नामुष्की

या सामन्यानंतर न्यूयॉर्कच्या नसाऊ कौंटी स्टेडियममध्ये वापरण्यात आलेल्या खेळपट्टीबाबतचे मत विचारले असता रोहित म्हणाला, ‘‘खेळपट्टीचा अंदाज बांधणे अवघड आहे असे मी नाणेफेकीच्या वेळीही सांगितले होते. आम्हाला ‘ड्रॉप इन’ खेळपट्टीवर खेळण्याचा फारसा अनुभव नाही. येथील खेळपट्टय़ा साधारण पाच महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या खेळपट्टीकडून नक्की काय अपेक्षा करायच्या आणि त्यावर कसे खेळायचे याबाबत संभ्रम आहे.’’

तसेच या सामन्यादरम्यान समालोचन करणाऱ्या पठाणने न्यूयॉर्क येथील खेळपट्टीवर टीका केली. ‘‘अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार व्हावा अशी सर्वाचीच इच्छा आहे. मात्र, ही खेळपट्टी खेळाडूंसाठी सुरक्षित नाही. अशा प्रकारची खेळपट्टी भारतात वापरली गेली असती, तर पुन्हा त्या केंद्रावर बराच काळ सामना झाला नसता. ही एखादी द्विदेशीय मालिका नसून ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आहे. इतक्या मोठय़ा स्पर्धेत अशा प्रकारची खेळपट्टी वापरली जाणे अजिबातच योग्य नाही,’’ असे स्पष्ट मत पठाणने व्यक्त केले.

हेही वाचा >>>राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कादंबरी राऊतने जिंकलं सुवर्ण पदक

भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरनेही आपल्या वेगळय़ा शैलीत खेळपट्टीवर भाष्य केले. ‘‘अमेरिकेतील प्रेक्षकांमध्ये ट्वेन्टी-२०च्या माध्यमातून कसोटी क्रिकेटची गोडी निर्माण करण्याचा विचार असल्यास न्यूयॉर्क येथे वापरण्यात आलेली खेळपट्टी अतिशय उत्कृष्ट आहे असे म्हणू शकतो,’’ अशी उपरोधिक टीका जाफरने केली.

आता याच मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित सामना ९ जूनला रंगणार आहे. अमेरिकेत क्रिकेटच्या प्रसारासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, खेळपट्टीच्या स्वरूपामुळे या सामन्याची मजा कमी होण्याची भीती क्रिकेट जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

ऑस्ट्रेलियातून खेळपट्टय़ा..

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ऑस्ट्रेलियात तयार करण्यात आलेल्या १० ‘ड्रॉप इन’ खेळपट्टय़ा मे महिन्याच्या सुरुवातीला न्यूयॉर्कमध्ये आणल्या. यातील चार खेळपट्टय़ा सामन्यांसाठी, तर सहा खेळपट्टय़ा सरावासाठी तयार करण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड ओव्हल मैदानाचे खेळपट्टी देखरेखकार (क्युरेटर) डेमियन हॉग यांनी या खेळपट्टय़ा तयार केल्या आहेत.

रोहितची दुखापत गंभीर नाही

आर्यलडविरुद्धच्या सामन्यात रोहितने ३७ चेंडूंत ५२ धावांची शानदार खेळी केली. मात्र, अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर रोहितच्या खांद्याला चेंडू लागला. डावखुरा वेगवान गोलंदाज जोश लिटलने आखूड टप्प्यावर टाकलेला चेंडू अतिरिक्त उसळी घेऊन रोहितच्या उजव्या खांद्यावर आदळला. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. मात्र, रोहितची दुखापत गंभीर नसल्याचे ‘बीसीसीआय’मधील सूत्रांनी सांगितले. ‘‘रोहितची दुखापत गंभीर नाही. त्याचा खांदा थोडा दुखत होता, पण तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी निश्चितपणे उपलब्ध असेल. त्यापूर्वी भारतीय संघाची दोन सराव सत्रेही होणार आहेत,’’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अमेरिकेत क्रिकेटला चालना मिळावी यासाठी होत असलेला प्रयत्न नक्कीच चांगला आहे. मात्र, खेळाडूंना अशा प्रकारच्या अतिशय साधारण खेळपट्टीवर खेळावे लागणे हे अस्वीकार्ह आहे. विश्वचषक स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत घेता. त्यानंतर अशा प्रकारच्या खेळपट्टीवर खेळावे लागणे हे योग्य नाही. – मायकल वॉन, इंग्लंडचा माजी कर्णधार.

आर्यलडच्या फलंदाजीदरम्यान चेंडूला अतिरिक्त उसळी मिळत होती आणि आमच्या फलंदाजीदरम्यानही खेळपट्टीच्या स्वरूपात बदल झाला नाही. येथे कसोटी सामन्याप्रमाणे गोलंदाजी करणे आवश्यक होते. ते आम्ही केले. या खेळपट्टीकडून नक्की काय अपेक्षा करावी हे ठाऊक नाही. आता आम्ही याच मैदानावर पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहोत. त्या सामन्यात आम्हाला पूर्ण तयारीनिशी मैदानावर उतरावे लागेल. – रोहित शर्मा, भारताचा कर्णधार.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma is of the opinion that it is difficult to predict the pitches for hosting the twenty20 world cup cricket tournament in america sport news amy