विशाखापट्टणम : सूर्यकुमार यादवमधील प्रतिभा सर्वानाच ठाऊक आहे. प्रतिभावान खेळाडूंना आम्ही अधिकाधिक संधी देत राहणार असल्याचे मी आधीही स्पष्ट केले आहे. सूर्यकुमारला आमचा पूर्ण पािठबा आहे. परंतु एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या कामगिरीत सुधारणा अपेक्षित असल्याचे त्यालाही ठाऊक आहे, असे वक्तव्य भारताचा कर्णधार रोहित शर्माने केले.
ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या सूर्यकुमारला एकदिवसीय क्रिकेटमध्ये अद्याप छाप पाडता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोनही सामन्यांत सूर्यकुमारला डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पहिल्याच चेंडूवर पायचीत पकडले. त्यामुळे त्याच्या फलंदाजीच्या तंत्राबाबात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सूर्यकुमारला गेल्या १६ एकदिवसीय सामन्यांत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याच्यावरील दडपण वाढत आहे. परंतु सूर्यकुमारचे एकदिवसीय संघातील स्थान तूर्तास तरी सुरक्षित असल्याचे रोहितने स्पष्ट केले आहे.
‘‘श्रेयस अय्यरचे पुनरागमन कधी होणार हे आम्हाला ठाऊक नाही. त्यामुळे एकदिवसीय संघातील एक स्थान रिक्त असून सूर्यकुमारला संधी मिळते आहे. त्याने यापूर्वी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा आणि गुणवत्ता सिद्ध केली आहे. प्रतिभावान खेळाडूंना आम्ही अधिकाधिक संधी देणार असल्याचे मी याआधीही म्हणालो आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सूर्यकुमारच्या कामगिरीत सुधारणेला नक्कीच वाव आहे आणि हे त्यालाही ठाऊक आहे. परंतु आमचा त्याला पूर्ण पािठबा आहे. ‘मला स्वत: सिद्ध करण्यासाठी पुरेशी संधी मिळाली नाही,’ असे कोणत्याही खेळाडूला वाटू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो,’’ असे रोहितने सांगितले.
‘‘गेल्या दोन सामन्यांत सूर्यकुमार लवकर बाद झाला. त्यापूर्वीच्या काही सामन्यांतही त्याच्या धावा झाल्या नाहीत. असे असले तरी त्याला सातत्याने सामने खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. त्याला सलग ७-८ सामने खेळण्याची संधी मिळाल्यास त्याचा आत्मविश्वास वाढेल. आम्हाला सूर्यकुमारच्या कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. सध्या एक खेळाडू जायबंदी झाल्याने सूर्यकुमारला सामने खेळायला मिळत आहेत. परंतु आम्ही संघ व्यवस्थापन म्हणून केवळ खेळाडूच्या कामगिरीकडे पाहतो. त्याला अधिकाधिक संधी देण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यानंतरही तो खेळाडू अपयशी ठरल्यास आम्हाला अन्य खेळाडूचा विचार करावा लागतो. सध्या तरी ती वेळ आलेली नाही,’’ असे रोहित म्हणाला.