Rohit Sharma first Indian player to be out on zero 3 times in Asia Cup: भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया चषक सुपर फोर फेरीचा शेवटचा सामना खेळला जात आहे. दोन्ही संघ कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये समोरासमोर आले आहेत. बांगलादेशच्या २६५ धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहित शर्माला तनझिम हसन साकिबने बाद केले. यानंतर रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. वास्तविक, आशिया कपच्या इतिहासात रोहित शर्मा तिसऱ्यांदा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.
रोहित शर्माच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद –
आशिया चषकाच्या इतिहासात तीनदा शून्यावर बाद होणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय खेळाडू आहे. याशिवाय रोहित शर्मा आशिया कपच्या इतिहासात दोनदा शून्यावर बाद होणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. तसेच रोहित शर्माच्या नावावर आणखी एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. वास्तविक, आशिया कपच्या इतिहासात रोहित शर्मा शून्यावर बाद होणारा पहिला भारतीय कर्णधार आहे. यापूर्वी आशिया कप १९८८ मध्ये दिलीप वेंगसाकर कर्णधार म्हणून शून्यावर बाद झाले होते.
टीम इंडियासमोर २६६ धावांचं लक्ष्य –
भारत-बांगलादेश सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियासमोर विजयासाठी २६६ धावांचे लक्ष्य आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशने ५० षटकांत ८ गडी गमावून २६५ धावा केल्या. तत्पूर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशसाठी कर्णधार शाकीब अल हसन आणि तौहीद हृदय यांनी ५० धावांचा टप्पा ओलांडला.
हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माने रचला इतिहास, भारताकडून ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पाचवा खेळाडू
भारताकडून वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ बळी घेतले. बांगलादेशच्या २६५ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने वृत्त लिहिपर्यंत २७ षटकांत ४ बाद १३३ धावा केल्या आहेत. सध्या शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर आहेत. त्याचबरोबर रोहित शर्मा, केएल राहुल, इशान किशन आणि तिलक वर्मा पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.