विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत रविवारी सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि सलामीवीर पृथ्वी शॉ यंनी महिला संघाला प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या. तसेच विश्वचषक २०२२ स्पर्धेदरम्यान भारतीय महिला संघाला पाठिंबा देण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे. महिलांचा एकदिवसीय विश्वचषक ४ मार्चपासून सुरु होणार असून पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघाचा समावेश आहे. ३ एप्रिलला क्राइस्टचर्चमध्ये अंतिम विजेता ठरेल.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने #HamaraBlueBandhan मोहिमेचा व्हिडीओ Instagram Reels वर पोस्ट केला आहे. तर, भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की, “महिला क्रिकेट संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी यापेक्षा चांगली संधी नाही. कारण आयसीसी विश्वचषकातील भारताचा पहिला सामना ६ मार्च २०२२ रोजी सकाळी ६.३० वाजता होत आहे. तेव्हा अलार्म सेट करा.”
भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतनेही महिला संघाला पाठिंबा देणारी पोस्ट केली आहे. “भारतीय महिला संघ विश्वचषक २०२२ च्या मिशनवर आहे. #HamaraBlueBandhan ला तुमचा पाठिंबा दर्शवण्यासाठी माझ्यासोबत सामील व्हा. चला.” असं त्याने लिहीलं आहे. तर भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ यांनी पोस्ट केले आहे की, “आयसीसी महिला विश्वचषक २०२२ आला आहे. महिला संघाला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी मी तयार आहे. विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आहे! तुम्ही देखील तयार आहात का?”. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचं १२ वं पर्व आहे. १९८२ आणि २००० नंतर न्यूझीलंडमध्ये होणारा तिसरा वर्ल्डकप आहे. ४ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत ऑकलंड, क्राइस्टचर्च, ड्युनेडिन, हॅमिल्टन, टॉरंगा आणि सहा वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवला जाईल. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे आठ संघ आहेत. या संघांमध्ये एकून ३१ सामने होणार आहेत.