Team India leaves Dubai for Champions Trophy 2025 : म्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानच्या यजमानपदाखाली सुरू होणार आहे, ज्यासाठी ८ पैकी ७ संघ पाकिस्तानला पोहोचत आहेत, तर भारतीय संघ १५ फेब्रुवारी रोजी दुबईला रवाना झाला आहे, जिथे तो या स्पर्धेत आपले सामने खेळेल. टीम इंडिया मुंबई विमानतळावरुन दुबईला रवाना झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये विराट-रोहित आणि कोच गौतम गंभीर दिसत आहे.
भारताने आपल्या संघ खूप आधी जाहीर केला होता, ज्यामध्ये रवाना होण्यापूर्वी २ बदल दिसून आले. या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला होता. या महत्त्वाच्या स्पर्धेत टीम इंडियाला २० फेब्रुवारी रोजी बांगलादेश संघाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. तेथील परिस्थिती लक्षात घेऊन, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दुबईला रवाना झालेल्या भारतीय संघात कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांच्यासह ५ फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे.
जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर झाला तेव्हा जसप्रीत बुमराहला त्यात स्थान मिळाले, परंतु तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, यशस्वी जैस्वालच्या जागी वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आले. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी, भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली, ज्यामध्ये त्यांनी तिन्ही सामने जिंकण्यात यश मिळवले आणि यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही आपला फॉर्म परत मिळवण्यात यशस्वी झाले.
भारत २३ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध भिडणार –
भारत आणि पाकिस्तानचे चाहते २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दिवशी टीम इंडिया दुबईच्या मैदानावर ग्रुप-ए मध्ये यजमान पाकिस्तानशी सामना करेल. टीम इंडियाचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होतील. भारतीय संघाला गटातील शेवटचा सामना २ मार्च रोजी न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळायचा आहे. जर टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाली, तर ते दुबईच्या मैदानावरच जेतेपदाचा सामना खेळतील.