Rohit Sharma Meets Musheer Khan and His Father: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बांगलादेश कसोटी मालिकेनंतर सध्या विश्रांतीवर आहे. रोहित आता न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत मैदानात उतरणार आहे. १६ ऑक्टोबरपासून दोन्ही संघांमध्ये ही मालिका खेळवली जाणार आहे. पण या मालिकेपूर्वी रोहित शर्माच्या कृतीने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

रोहित शर्माने मुंबईचा क्रिकेटपटू आणि भारतीय संघातील खेळाडू सर्फराज खानचा भाऊ मुशीर खान याची भेट घेतली. मुशीर खानचा इराणी कप सामन्यापूर्वी रस्ते अपघात झाला होता. या अपघातात त्याला दुखापत झाल्याने तो सध्या यात रिकव्हर होत आहे. यादरम्यान रोहितने मुशीर खान आणि त्याचे वडील नौशाद खान यांची भेट घेतली. ज्याचा फोटो मुशीर खानने शेअर केला आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काही कसोटींना मुकणार? काय आहे कारण

१९ वर्षीय खेळाडू मुशीर खान हा मुंबईचा स्टार खेळाडू म्हणून उदयाला येत आहे. गेल्या महिन्याच्या शेवटी, तो त्याचे वडील नौशाद खान यांच्यासोबत इराणी चषक सामन्यासाठी कानपूरहून लखनौला जात असताना त्याच्या कारला अपघात झाला. यावेळी त्यांची दुभाजकाला धडकून पलटी झाल्याने अपघात झाला, त्यामुळे त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्याच्या मानेला फ्रॅक्चरही आहे.

मुशीर खान या दुखापतीतून रिकव्हर होत असतानाच रोहित शर्माने त्याची भेट घेतली आणि विचारपूस केली आहे. रोहितने मुशीर आणि त्याचे वडील नौशाद खान यांच्याबरोबर फोटोही काढला. मुशीर आणि त्याचा मोठा भाऊ सर्फराज खान यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा – Harry Brook Triple Century: मुलतान का नया सुलतान! हॅरी ब्रुकने झळकावले कसोटीतील दुसरे सर्वात वेगवान त्रिशतक, वीरेंद्र सेहवागचा महाविक्रमही मोडला

चाहत्यांकडून हिटमॅनचं होतंय कौतुक

मुशीर खानने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सर्वांनीच रोहित शर्माचं कौतुक केलं आहे आणि मुशीर खानला लवकरात लवकर पुनरागमन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “हिटमॅन प्रत्येक खेळाडूची काळजी घेतो”, “कॅप्टन असावा तर रोहित शर्मासारखा…” “म्हणूनच तर सगळे रोहित शर्माचे चाहते आहेत..”, अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

मुशीर खानला मैदानात परतण्यासाठी वेळ लागणार आहेय दुखापतीमुळे तो इराणी चषक सामनाही खेळू शकला नाही आणि रणजी ट्रॉफीच्या पहिल्या दोन फेऱ्यांसाठी त्याची संघात निवड झालेली नाही. सुमारे तीन महिने तो क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचे मानले जात आहे. सर्फराझ खानप्रमाणेच त्याचा भाऊही वडिलांकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे. मुशीर खानने भारतासाठी अंडर-19 विश्वचषक खेळला आहे आणि आता तो मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.