Rohit Sharma Injury Champions Trophy: भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पण त्यापूर्वी संघाला गट सामन्यातील अखेरचा सामना २ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली असून बुधवारी रात्री संपूर्ण संघाने नेटमध्ये सराव केला. मात्र सरावादरम्यान भारतीय संंघाचे दोन सर्वात महत्त्वाचे खेळाडू अनुपस्थित होते.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिल सराव करताना दिसले नाहीत. क्रिकबझच्या वृत्तानुसार, शुबमन गिल आजारी आहे आणि त्यामुळे तो सरावाला येऊ शकला नाही. दुबईमध्ये, भारतीय संघाने आयसीसी अकादमीमध्ये ३ तास सराव केला, परंतु यादरम्यान कर्णधार रोहित थोडा वेळही नेटवर सरावासाठी आला नाही. रोहित सरावाला का आला नाही याबाबत अधिकृत वक्तव्य आले नसले तरी सध्या तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत असल्याचे मानले जात आहे.

रोहित शर्माला २३ फेब्रुवारीला पाकिस्तानविरूद्ध सामन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा त्रास झाला होता. पाकिस्तानविरूद्ध सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सीमारेषेजवळ जाणारा चेंडू थांबवण्यासाठी रोहित चांगलाच धाव घेत गेला. यादरम्यान त्याच्या हॅमस्ट्रिंगमध्ये त्याला त्रास जाणवला. पाकिस्तानच्या डावात तो काही काळ मैदानाबाहेरही गेला पण नंतर मैदानात परतला. भारताच्या २४२ धावांचे यशस्वी पाठलाग करताना रोहितनेही फलंदाजी करत १५ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २० धावा केल्या.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, या सराव सत्रादरम्यान रोहित शर्मा संघासह तिथे उपस्थित होता, परंतु तो बाहेरून आपल्या संघातील खेळाडूंना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा सराव करताना पाहत होता. २ मार्चपूर्वी त्याला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून रोहित त्याच्या दुखापतीबाबत काळजी घेत असल्याचे मानले जात आहे. याशिवाय भारताला यानंतर उपांत्य फेरी खेळायची आहे आणि जर उपांत्य फेरीत भारत जिंकला तर त्यांना अंतिम फेरीतही खेळायचं आहे. असंही भारत उपांत्य फेरीत पोहोचला आहे, त्यामुळे रोहितला न्यूझीलंडविरुद्ध विश्रांती दिली तरी फारसा फरक पडणार नाही.

जर रोहितच्या दुखापतीचा विचार करता त्याला आराम दिल्यास संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतात. रोहितबाबत संघ व्यवस्थापन कोणतीही जोखीम पत्करणार नाही आणि जर त्याला विश्रांती मिळाली तर तो दुखापतीतून लवकर बरा होऊ शकतो. गिल सध्या आजारी असल्याने सरावाच्या वेळी संघासोबत उपस्थित नव्हता. मात्र, २ मार्चला होणाऱ्या सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे. तर रोहित शर्मा संघात नसल्यास ऋषभ पंत किंवा वॉशिंग्टन सुंदर यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाईल.

Story img Loader