दुबई : रोहित शर्माला विश्वचषक संपल्यानंतर सोमवारी स्पर्धेच्या ‘आयसीसी’च्या प्रातिनिधिक संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. या संघात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या विराट कोहलीसह सहा भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. भारताला रविवारी अहमदाबादला झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले. ऑस्ट्रेलियाने आपला सहावा विश्वचषक पटकावला.
रोहितने संपूर्ण स्पर्धेदरम्यान आक्रमक आणि निर्भीडपणे फलंदाजी केली. रोहितने ११ सामन्यांत एक शतक व तीन अर्धशतकांसह ५४.२७च्या सरासरीने ५९७ धावा केल्या. तो कोहलीनंतर स्पर्धेत भारताकडून दुसरा यशस्वी फलंदाज राहिला. विराटने तीन शतक व सहा अर्धशतकांच्या बळावर ७६५ धावा झळकावल्या. भारताने स्पर्धेच्या साखळी सामन्यात सलग दहा सामने जिंकले. यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुलला देखील संघात स्थान मिळाले. साखळी फेरीतील सुरुवातीच्या चार सामन्यांत संघाबाहेर राहिलेल्या मोहम्मद शमीने केवळ सात सामन्यांत २४ गडी बाद केले.
हेही वाचा >>> ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी
जसप्रीत बुमरालाही (२० बळी ) संघात स्थान मिळाले आहे. अष्टपैलू म्हणून भारताचा रवींद्र जडेजा आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल यांची संघात वर्णी लागली आहे. विश्वचषक संपल्यानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या क्विंटन डीकॉकलाही सलामी फलंदाज म्हणून स्थान मिळाले आहे. न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेललाही संघात स्थान देण्यात आले आहे. श्रीलंकेचा युवा गोलंदाज दिलशान मदुशंका (२१ बळी)व लेग-स्पिनर अॅडम झॅम्पा(२३ बळी) या दोन्ही गोलंदाजांचा समावेश आहे. तर, दक्षिण आफ्रिकेचा जेराल्ड कोएट्झीला १२ खेळाडू म्हणून स्थान मिळाले आहे.
‘आयसीसी’चा स्पर्धेतील प्रातिनिधिक संघ
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, विराट कोहली, डॅरेल मिचेल, केएल राहुल, ग्लेन मॅक्सवेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, अॅडम झॅम्पा, दिलशान मदुशंका, जेराल्ड कोएट्झी (१२वा खेळाडू)