Rohit Sharma on Ravichandran Ashwin’s not playing ODI format is not a concern: रविचंद्रन अश्विन हा भारतीय क्रिकेटमधील विश्वचषकाचा सरप्राईज फॅक्टर बनला आहे. तो बराच काळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून बाहेर आहे. पण २०२१ आणि २०२२ चा टी-२० विश्वचषक असो किंवा २०२३ मध्ये होणारा एकदिवसीय विश्वचषक असो, टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना विश्वचषकासारखी स्पर्धा समोर दिसताच अश्विनची आठवण होते. यावेळीही विश्वचषकापूर्वी निवडकर्त्यांनी अश्विनची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील वनडे मालिकेसाठी निवड केली आहे. रोहित शर्माने रविचंद्रन आश्विनच्या निवडीवर प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित शर्माने आश्विनच्या परतण्याचे सांगितले कारण –
अश्विनच्या निवडीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. नुकताच भारतासाठी आशिया चषक जिंकून पुनरागमन करणारा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “अश्विन बराच काळ या फॉरमॅटमध्ये खेळत नाही ही चिंतेची बाब नाही. कारण त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूसाठी हा खेळ शरीरापेक्षा डोक्याने खेळायचा असतो. बाकी, तो या फॉरमॅटमध्ये खेळला नसून सतत क्रिकेट खेळत आहे.”
अश्विन सतत खेळतो क्रिकेट –
मुख्य निवडकर्ता अजित आगरकरसोबत पत्रकार परिषदेत अश्विनच्या पुनरागमनावर प्रतिक्रिया देताना रोहित म्हणाला, ‘त्याला ज्या प्रकारचा अनुभव आहे. त्याने सुमारे १०० कसोटी सामने खेळले आहेत आणि एकदिवसीय १५० सामने खेळले आहेत. तो सातत्याने कसोटी क्रिकेट खेळत आहे. अश्विनसारख्या खेळाडूसाठी मैदानावर वेळ घालवणे ही चिंतेची बाब नाही. कारण त्याच्यासारख्या खेळाडूकडे इतका अनुभव आहे की त्याला शरीरापेक्षा डोक्याने खेळावे लागते.”
हेही वाचा – IND vs AUS; ‘आम्हाला काही खेळाडूंची चाचणी आणि…’; वनडे मालिकेसाठी निवडलेल्या संघावर रोहित शर्माची प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वाची वनडे मालिका –
तो म्हणाला, ‘मी त्याच्याशी बोलतोय आणि समजून घेत आहे की तो सध्या त्याच्या शरीरासह कुठे आहे. तो क्रिकेट खेळत नाही असे नाही, तो हा फॉरमॅट (वनडे) खेळला नाही, पण अलीकडेच तो टीएनपीएलमध्ये खेळला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये तो आपल्या शरीराने कुठे आहे, हे समजून घेण्याची संधी आपल्याला मिळेल.’
रविचंद्रन अश्विनने १८ महिन्यांपूर्वी खेळला होता शेवटचा वनडे –
आर अश्विनने जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. पण आता पुन्हा एकदा भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते त्याच्या ऑफ-स्पिन गोलंदाजीवर विश्वास व्यक्त करत आहेत. मात्र, भारताने आपला १५ सदस्यीय विश्वचषक संघ जाहीर केला असून, त्यात अश्विनला स्थान मिळालेले नाही. मात्र या संघात सध्या बदल शक्य आहेत, त्यामुळे अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली उपयुक्तता सिद्ध केल्यास विश्वचषक संघातील त्याच्यासाठी दरवाजे उघडू शकतात, असे मानले जात आहे.