Rohit Sharma On The Field During Video Viral in IND vs AUS 5th Test : भारतीय कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना खेळत नाहीये. सतत फॉर्मशी झगडत असलेल्या रोहितने या सामन्यातून बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याला संघातून वगळण्यात आल्याचेही बोलले जात आहे. या सामन्यासाठी घोषित करण्यात आलेल्या १६ खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माचे नाव नव्हते. सामन्याच्या पहिल्या दिवशी तो मैदानावरही दिसला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित मैदानात दिसला आणि आपल्या कृतीने सर्वांची मनं जिंकली. त्याचा व्हिडीओ आणि फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
सिडनी क्रिकेट मैदानावर दुसऱ्या दिवशी खेळाच्या पहिल्या तासानंतर ड्रिंक्स ब्रेक होता. यामध्ये प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसलेले खेळाडू आपल्या सहकाऱ्यांसाठी ड्रिंक्स घेऊन मैदानात पोहोचले. यामध्ये कर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे. मैदानावर गेल्यानंतर त्याने या सामन्यात कर्णधार असलेल्या जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांच्याशी चर्चा केली. हे तिघेही संघातील इतर खेळाडूंपासून वेगळे उभे राहून बोलतांना दिसले.
रोहित शर्मा अजूनही भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार आहे. बुमराह सिडनीमध्ये कार्यकारी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्त्व करत आहे. बुमराह आणि पंतशिवाय रोहितने मैदानावर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजशीही चर्चा केली. रोहितच्या हातात पाणी किंवा छत्री नव्हती. सहकारी खेळाडूंशी बोलण्यासाठीच तो मैदानात पोहोचल्याचे दिसत होते.
हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने घडवला इतिहास! ऑस्ट्रेलियात ‘हा’ मोठा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज
दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात पाच गडी गमावून १०१ धावा केल्या होत्या. सध्या ब्यू वेबस्टर २८ धावांवर नाबाद असून ॲलेक्स कॅरी चार धावांवर नाबाद आहे. भारताने पहिल्या डावात १८५ धावा केल्या होत्या. या बाबतीत ऑस्ट्रेलियन संघ अजूनही ८४ धावांनी मागे आहे. आज ऑस्ट्रेलियाने एका विकेटवर नऊ धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि ९२ धावा करताना चार विकेट गमावल्या.
हेही वाचा – IND vs AUS : मिचेल स्टार्कच्या वेगवान माऱ्याने ऋषभ पंत घायाळ, पट्टी बांधून खेळतानाचा VIDEO व्हायरल
शुक्रवारीच उस्मान ख्वाजा दोन धावा करून बुमराहचा बळी ठरला. यानंतर आज बुमराहने मार्नस लबूशेनला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केले. त्याला दोन धावा करता आल्या. तेव्हा सिराजचा कहर दिसला. त्याने डावाच्या १२व्या षटकात सॅम कॉन्स्टास आणि ट्रॅव्हिस हेडला बाद केले. कॉन्टासला २३ तर हेडला चार धावा करता आल्या. यानंतर प्रसिध कृष्णाने स्टीव्हन स्मिथला राहुलकरवी झेलबाद केले. त्याला ३३ धावा करता आल्या.