Shivam Dube react on who is best captain Dhoni or Rohit : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांच्यातील सर्वोत्तम कर्णधार कोण यावर अनेकदा चर्चा झाली आहे. अलीकडे युवा अष्टपैलू शिवम दुबेलाही याच प्रश्नाला सामोरे जावे लागले. रोहितसोबत एका कॉमेडी टॉक शोमध्ये सहभागी झालेल्या दुबेला जेव्हा विचारण्यात आले की आवडता कर्णधार कोण आहे, तेव्हा त्याने हुशारीने उत्तर दिले आणि या अवघड प्रश्नातून आपली सुटका करुन घेतली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धोनी आणि रोहित शर्माच्या कर्णधारपदावरील प्रश्नावर शिवम दुबे खूपच गोंधळलेला दिसला. अलीकडेच रोहित शर्मा आणि शिवम दुबे यांच्यासह टीम इंडियाचे काही स्टार्स ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पोहोचले होते. या शोचा होस्ट कपिल शर्माने भारतीय अष्टपैलू खेळाडूला कर्णधारपदावर प्रश्न विचारले. दुबे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो, जिथे तो धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे आणि टीम इंडियासाठी तो रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.
शिवम दुबे काय म्हणाला?
कपिलने शिवम दुबेला विचारले, “शिवम, तू दोन संघांसाठी खेळतोस. तू धोनीसोबत खेळतोस आणि तू रोहितसोबतही खेळतोस. तुला कोणता कर्णधार जास्त आवडतो?” हा प्रश्न ऐकून रोहित शर्मा म्हणतो, ‘फसला.’ त्यानंतर सूर्यकुमार यादव कपिल शर्माला म्हणतो, “तुम्ही खूप अवघड प्रश्न विचारला आहे.” त्यानंतर शिवमने धोनी आणि रोहितच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “जेव्हा मी चेन्नईसाठी खेळतो, तेव्हा धोनी सर्वोत्तम असतो, जेव्हा मी टीम इंडियासाठी खेळलो. तेव्हा रोहित सर्वोत्तम असतो.” रोहितनेही दुबेच्या प्रतिभेचे कौतुक केले आणि चिडवत म्हणाला, हे विलक्षण आहे. टॉक शोच्या दोन-तीन दिवस आधी तू अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा सराव करतो का?
हेही वाचा – IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली कोणाकोणाला मिळणार संधी? जाणून घ्या भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेच्या अवघ्या काही तासांपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू शिवम दुबे पाठीच्या दुखापतीमुळे तीन सामन्यांच्या मालिकेत खेळू शकणार नाही. आता निवड समितीने रोहित शर्माच्या आवडत्या खेळाडूंपैकी एक असलेल्या तिलक वर्माला त्याच्या जागी नियुक्त केले आहे. सामन्याच्या दिवशी सकाळी तिलक ग्वाल्हेरमध्ये संघात सामील झाला.
हेही वाचा – ‘ऋषभ पंतच्या त्या चलाखीमुळं टी२० विश्वचषक जिंकलो’, तीन महिन्यांनंतर रोहित शर्माचा मोठा खुलासा
दुबेची ही दुखापत जुनी –
शिवम दुबेची दुखापत नुकतीच उद्भवली आहे आणि तो आता पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीला रिपोर्ट करणार आहे. दुबेने आतापर्यंत भारतासाठी ३३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि ४४९ धावा केल्या आहेत आणि ११ विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेशविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी मुंबईत प्रशिक्षणादरम्यान दुबेच्या पाठीची दुखापत पुन्हा बळावली होती. त्यानंतर ग्वाल्हेरला आल्यानंतरही वेदना कमी झाल्या नाहीत आणि प्रशिक्षणादरम्यान त्याला अस्वस्थ वाटू लागले, असे मानले जाते.