भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यान आयसीसी क्रमवारीत चढउतार दिसून येत आहेत. चांगल्या फॉर्मात असलेला इंग्लंडचा कर्णधार जो रूट कसोटी क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. तर दुसरीकडे भारतीय कर्णधार विराट कोहलीला खराब कामगिरीचा फटका बसला आहे. टॉप ५ फलंदाजांच्या क्रमवारीतून मागे पडला आहे. तर रोहित शर्माला टॉप ५ फलंदाजांमध्ये स्थान मिळालं आहे.

पाच वर्षात पहिल्यांदाच कर्णधार विराट कोहली टॉप ५ मधून बाहेर गेला आहे. विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या ५ डावात फक्त एक अर्धशतक झळकवण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे विराट कोहलीला ९ गुणांचं नुकसान झालं. त्यामुळे आता ७६६ गुणांसह तो सहाव्या स्थानावर आहे. तर आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा कसोटीत चांगली कामगिरी करत आहे. दोन वर्षापूर्वी जेव्हा रोहित शर्माला कसोटीत संधी देण्यात आली होती. तेव्हा रोहित क्रमवारीत ५३ व्या स्थानी होता. मात्र त्याच्या चांगल्या खेळीमुळे तो टॉप ५ मध्ये पोहोचला आहे. रोहित शर्मा ७७३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

इंग्लंडचा कर्णधार जो रूट ६ वर्षानंतर कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. या वर्षीच्या सुरुवातील जो रूट फलंदाजांच्या क्रमवारीत नवव्या स्थानावर होता. त्याने त्यांच्या फलंदाजीने खोऱ्याने धावा केल्या आणि पहिलं स्थान पटकावलं आहे. जो रुट ९१६ गुणांसह पहिल्या, न्यूझीलंडचा केन विलियमसन ९०१ गुणांसह दुसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मित ८९१ गुणांसह तिसऱ्या, तर मार्नस लॅबुशेंज ८७८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

दुसरीकडे कसोटी गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाच पॅट कमिन्स ९०८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ८३९ गुणांसह आर. अश्विन दुसऱ्या स्थानी, ८२४ गुणांसह टीम साऊदी तिसऱ्या, ८१६ गुणांसह जोश हेझलवूड चौथ्या स्थानी, तर इंग्लंडचा जेम्स अँडरसन ८१३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या क्रमवारीत ७५८ गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

Story img Loader