भारतीय क्रिकेट संघाचा वन-डे आणि टी-२० संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यो-यो फिटनेस चाचणी पास झाला आहे. याचसोबत गेल्या दोन दिवसांपासून रोहित शर्माच्या संघातील सहभागाबद्दल असणारा संभ्रम अखेर दूर झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माने प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ठरवून दिल्याप्रमाणे किमान गुण मिळवत आपली संघातली जागा पक्की केली आहे. दोन दिवसांपूर्वी बीसीसीआयने रोहित शर्माच्या जागी अजिंक्य रहाणे पर्यायी खेळाडू म्हणून सज्ज राहण्यासाठी सांगितलं होतं.
रोहितने फिटनेस चाचणीनंतर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फिटनेस चाचणी पास झाल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे.
फिटनेस चाचणी पास झाल्यानंतर रोहित आता भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्याला रवाना होणार आहे. सुरुवातीला भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध २ टी-२० सामने खेळणार आहे. मात्र या निकालानंतर अजिंक्य रहाणेच्या विश्वचषकातील संघात स्थान मिळवण्याच्या आशा आता धुसर झाल्या आहेत. आयपीएमध्ये रोहित शर्माला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे यो-यो फिटनेस चाचणी पास केल्यानंतर रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यात कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.