मुंबई आणि क्रिकेटचं एक आगळं वेगळं नातं आहे. आपल्या खडुस वृत्तीसाठी ओळखले जाणारे मुंबईकर, जिथे जागा मिळतील तिकडे क्रिकेटचा सराव करतात. यासाठी त्यांना मैदानाची गरज लागतेच अशातला काही भाग नाही. मुंबईच्या अनेक गल्ल्यांमध्ये मुलं रस्त्यावर क्रिकेट खेळताना तुम्ही पाहिलं असेल. भारताचा धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळख असलेल्या रोहित शर्मानेही रविवारच्या सुट्टीला गल्ली क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर रोहितने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
शनिवारी पुण्याच्या गहुंजे मैदानावर झालेल्या सामन्यात भारताला विंडीजकडून पराभव स्विकारावा लागला. यानंतर एका दिवसाच्या अंतराने भारतीय संघ सोमवारी ब्रेबॉन स्टेडीयमवर विंडीजशी दोन हात करेल. आपल्या घरच्या मैदानावर सामना असल्यामुळे रोहितने रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत गल्ली क्रिकेटचा आनंद लुटला आहे.
अवश्य वाचा – धोनीला वगळण्याचा निर्णय विराट-रोहितच्या संमतीनेच – BCCI
वन-डे मालिका आटोपल्यानंतर भारतीय संघ विंडीजशी 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेसाठी बीसीसीआयने विराट कोहलीला विश्रांती दिली असून, रोहित शर्मावर या मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. याचसोबत आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी संघातही रोहितने पुनरागमन केलं आहे. त्यामुळे रविवारच्या सुट्टीला गल्ली क्रिकेटमध्ये केलेला सराव रोहितला सोमवारच्या सामन्यात किती मदतशीर ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.