भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेमध्ये कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं दमदार कामगिरी करत चाहत्यांची मनं जिंकली आहेत. भारतीय संघाची या कसोटी मालिकतली कामगिरी संघाचं मनोधैर्य उंचावणारी ठरल्याचं अनेक क्रीडा विश्लेषकांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर संघातल्या सर्वच खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत असताना कर्मधार रोहित शर्मा मात्र एका भारतीय खेळाडूच्या बॅटिंगवर भलताच खूश झाला आहे. यासंदर्भात रोहित शर्मानं भर पत्रकार परिषदेत या खेळाडूच्या खेळाचं कौतुक करताना त्याच्या विशेष बाजूचा देखील त्यानं उल्लेख केला.
रोहित शर्मा फिदा झालेला हा खेळाडू म्हणजे ऋषभ पंत. ऋषभ पंतने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये तब्बल १२०.२ च्या सरासरीने एकूण १८५ धावा कुटल्या आहेत. यामध्ये एका रेकॉर्डब्रेक अर्धशतकाचा देखील समावेश आहे. ऋषभ पंतच्या बॅटिंगचा टीम इंडियाच्या २-० अशा विजयामध्ये सिंहाचा वाटा होता.
दरम्यान, रोहित शर्मानं ऋषभ पंतच्या बॅटिंगचं तोंडभरून कौतुक केलं आहे. रोहित शर्मानं ऋषभ पंतच्या अष्टपैलू खेळासोबतच त्याच्या डीआरएस घेण्याच्या पद्धतीचं देखील कौतुक केलं आहे.
“ऋषभ पंतला बॅटिंगचं स्वातंत्र्य द्यायचंय”
“त्याची बॅटिंग ही त्याची बॅटिंग आहे. तो कशी बॅटिंग करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि एक संघ म्हणून आम्हाला फक्त त्याला हवी तशी बॅटिंग करण्याचं स्वातंत्र्य द्यायचं आहे. कधीकधी मॅचमधली परिस्थिती पाहून त्यानुसार आम्ही त्याला काही गोष्टी सांगतो, पण बहुतेक वेळा आम्ही त्याच्या गेमप्लॅनसोबतच जायची निवड करतो. त्याचे गेम प्लॅन्स दिवसेंदिवस अधिकाधिक उत्तम होत चालले आहेत”, असं रोहित शर्मा म्हणाला.
४० मिनिटांत सामना फिरवण्याची ताकद!
दरम्यान, यावेळी बोलताना रोहित शर्मानं ऋषभ पंतची पाठराखण केली आहे. “कधीकधी असं काही घडतं की तुम्ही अक्षरश: तुमचं डोकं आपटून घेता आणि म्हणता की यानं असा शॉट का खेळला. पण तो बॅटिंग करत असताना आपल्याला अशा गोष्टींचा स्वीकार करायलाच हवा. कारण तो असा खेळाडू आहे, जो ४० मिनिटांत सामना फिरवू शकतो”, अशा शब्दांत रोहित शर्मानं ऋषभ पंतचं कौतुक केलं आहे.
IND vs SL : सुरंगा लकमलला बाद करताच जसप्रीत बुमराने मिठी मारली; पाहा VIDEO
डीआरएस आणि ऋषभ पंत
विकेट्सच्या मागे उभं राहून यष्टिरक्षण करताना ऋषभ पंतनं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांमध्ये घेतलेले डीआरएस संघासाठी फायदेशीर ठरले. ही त्याची विशेष बाब असल्याचं रोहित शर्मा म्हणाला आहे.
“या मालिकेमधला ऋषभ पंतची सगळ्यात विशेष बाब कुठली ठरली असेल, तर ते त्याचं यष्टिरक्षण. त्याचं सर्वोत्तम यष्टिरक्षण कौशल्य या मालिकेत दिसून आलं. यामुळ मी फारच प्रभावित झालो आहे. शिवाय डीआरएसच्या बाबतीत देखील तो बरोबर निर्णय घेऊ लागला आहे. डीआरएस एक लॉटरी असते. मी ऋषभला यासंदर्भात मला काय अपेक्षित आहे त सांगितलं होतं. डीआरएसबाबत तुमचा निर्णय नेहमीच बरोबर ठरू शकत नाही. कधीकधी ते चुकूही शकतात. पण ते ठीक आहे”, असं रोहित शर्मानं नमूद केलं.