बीसीसीआयने विराट कोहलीची उचलबांगडी करत भारताच्या एकदिवसीय कर्णधारपदावरून बाजुला केले. त्यामुळे रोहित शर्माला आता टी-२० सोबत वनडे संघाचेही कर्णधार बनवण्यात आले आहे. बीसीसीआयने विराटला पदावरून पायउतार होण्यासाठी वेळ दिला होता, परंतु विराटने वेळेची मर्यादा पाळली नाही. त्यानंतर रोहितला कप्तानपद देण्यात आले. या निवडीनंतर रोहितने विराटबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित शर्माने विराट कोहलीचे खूप कौतुक केले असून संघात त्याची उपस्थिती खूप महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. ‘बॅकस्टेज विथ बोरिया’ या शोमध्ये रोहित शर्मा म्हणाला, “विराट कोहलीसारख्या फलंदाजाची संघाला नेहमीच गरज असते. टी-२० क्रिकेटमध्ये ५० हून अधिकची सरासरी असणे खरोखरच कौतुकास्पद आहे. कठीण परिस्थितीत संघासाठी त्याने अनेकदा चांगली फलंदाजी केली आहे. संघाला विराटची गरज आहे आणि तो अजूनही या संघाचा नेता आहे. तुम्ही त्याला कुठल्याही परिस्थितीत सोडू शकत नाही. त्याची उपस्थिती संघासाठी खूप महत्त्वाची आहे.”
हेही वाचा – जमलं ना भाऊ..! रोहित कप्तान, तर ‘हा’ खेळाडू होणार उपकप्तान; BCCI लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत!
विराट कोहलीने यंदाच्या टी-२० वर्ल्डकपनंतर संघाचे कर्णधारपद सोडले होते आणि आता त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले. रोहित आता टी-२० तसेच वनडेच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. रोहितवर आता पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
विराटला दिला होता अवधी
बीसीसीआयने विराट कोहलीला स्वेच्छेने कर्णधारपद सोडण्यासाठी ४८ तासांचा अवधी दिला होता. यानंतर निवड समितीने बुधवारी विराटच्या जागी रोहितला भारताचा वनडे कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी बुधवारी भारताच्या १८ खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करतानाच रोहितच्या नावावर एकदिवसीय संघाचा कर्णधार आणि कसोटीचा उपकर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केले.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकुर, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्झन नागवालवाला.