Rohit Sharma Captaincy: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर सातत्याने निशाणा साधला जात आहे. रोहित शर्माच्या कसोटी कर्णधारपदाला तत्काळ धोका नसला तरी पारंपारिक कसोटी फॉरमॅटमधील कर्णधारपदावर टांगती तलवार आहे असे काही जाणकारांचे मत आहे. हे प्रश्नचिन्ह काढायचे असेल तर त्याला वेस्ट इंडिजमध्ये चमकदार कामगिरी करावी लागेल. अशा परिस्थितीत रोहित शर्माला वेस्ट इंडिज दौऱ्यावर पाठवले तर ही कसोटी मालिका त्याच्या कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर कर्णधारपदाचा निर्णय होईल
रोहित वेस्ट इंडिजमधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करेल आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत (बीसीसीआय) बसून कसोटी स्वरूपातील त्याच्या भविष्याबाबत चर्चा होईल. जर भारतीय संघातील सदस्यांना या प्रकरणाची माहिती असेल, तर १२ जुलैपासून डोमिनिका येथे होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कर्णधारपद सोडण्याचा निर्णय न घेतल्यास रोहित संघाचे नेतृत्व करेल. मात्र, डॉमिनिका किंवा पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार्या दुस-या कसोटीत (२० ते २४ जुलै) रोहितने कोणतीही मोठी खेळी न केल्यास, बीसीसीआयचे सर्वोच्च अधिकारी आणि राष्ट्रीय निवड समितीवर कठोर निर्णय घेण्याचा दबाव असेल.
रोहित शर्माला फॉर्ममध्ये परतणे आवश्यक आहे
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यात येणार असल्याच्या या निराधार चर्चा आहेत. होय, तो पूर्ण दोन वर्षांचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकलमध्ये कर्णधार म्हणून असेल का? हा एक मोठा प्रश्न आहे कारण २०२५ मध्ये तिसरी आवृत्ती संपेल तेव्हा तो ३८ वर्षांचा असेल. या क्षणी मला विश्वास आहे की, शिव सुंदर दास आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दोन कसोटीनंतर त्याचा फलंदाजीचा फॉर्म बघून पुढील निर्णय घ्यावा लागेल.”
यावर्षी टीम इंडिया फार कमी कसोटी सामने खेळणार
वास्तविक बीसीसीआय इतर देशांच्या क्रिकेट मंडळांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने काम करते. भारतीय मंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, “जेव्हा टीका शिगेला पोहोचते तेव्हा तुम्ही निर्णय घेत नाही.” सूत्राने सांगितले की, “वेस्ट इंडिजच्या दौऱ्यानंतर, डिसेंबरच्या अखेरीस भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यापर्यंत कोणतीही कसोटी मध्ये खेळणार नाही.” त्यामुळे निवडकर्त्यांकडे विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे. तोपर्यंत पाचवा निवडकर्ता (नवीन अध्यक्ष) देखील समितीत सामील होईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाऊ शकतो.
२०२२ मध्ये कर्णधारपद सोपवण्यात आले
२०२२ मध्ये रोहितने कसोटी कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून, भारताने १० कसोटी सामने खेळले, त्यापैकी तीन कसोटीत तो खेळला नाही. यादरम्यान त्याने सात कसोटीत ३९० धावा केल्या आणि त्याची ३०.०७ सरासरी होती. यादरम्यान त्याने शतक झळकावले पण याशिवाय दुसरी धावसंख्या ५० धावांच्या वर नव्हती. यादरम्यान विराट कोहलीने सर्व १० कसोटी सामने खेळले. त्याने १७ डावात ५१७ धावा केल्या आणि अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८६ धावा केल्या. यादरम्यान चेतेश्वर पुजाराने ८ कसोटी सामन्यांच्या १४ डावात ४८२ धावा केल्या, ज्यात दोन नाबाद खेळींचाही समावेश आहे. त्याची सरासरी ४०.१२ होती परंतु बांगलादेशच्या कमकुवत संघाविरुद्ध त्याने ९० आणि १०२ अशा धावा केल्या होत्या.