Yashasvi Jaiswal On Rohit Sharma & Rahul Dravid: भारताने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने एक डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला. त्याचवेळी यशस्वी जैस्वालची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. खरे तर यशस्वी जैस्वालचे या सामन्यात पदार्पण होते. पदार्पणात अशी खेळी केल्याने सर्वांकडूनच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यशस्वी जैस्वालने ३८७ चेंडूत १७१ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत १६ चौकार आणि एक षटकार मारला. मात्र, या सामन्यानंतर यशस्वी जैस्वालने आपला मुद्दा कायम ठेवला. यासोबत त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांची मदत कशी मिळाली हे सांगितले.
रोहित शर्माने सामन्यानंतर यशस्वी जैस्वालचे प्रथम कौतुक केले. कर्णधार म्हणाला की, “यशस्वीमध्ये प्रतिभा आहे, त्याने यापूर्वी दाखवून दिले की तो तयार आहे. मात्र, त्याने या सामन्यात ज्या हुशारीने फलंदाजी केली ती कौतुकास तो पात्र आहे. मी त्याच्या संयमाची परीक्षा घेतली आणि तो कोणत्याही परिस्थितीत घाबरला नाही. आमचे संभाषण फक्त त्याला आठवण करून देण्यासाठी होते की तू त्यास पात्र आहेस. तू आधी खूप मेहनत केली आहे आणि आता इथे फक्त ते अंमलात आणायचे आहे आणि खेळाची मजा घेत फलंदाजी करायची आहे.”
दुसरीकडे, या कसोटीत वेस्ट इंडिजच्या २० पैकी १७ विकेट्स घेणाऱ्या जडेजा आणि अश्विनच्या जोडीबद्दल रोहित म्हणाला, “रिझल्ट्स स्वतःच बोलतात, ते काही खूप वर्षापासून अशी कामगिरी करत आहेत. त्यांना सांगण्यासारखे फार काही नाही. त्यांच्याविषयी जेवढ बोललं तेवढ कमीच आहे. अशा खेळपट्ट्यांचा फायदा कसा घ्यावा हे त्यांच्याकडून शिकावे. त्यांना अशावेळी खूप मजा वाटते. अश्विन आणि जडेजा दोघेही हुशार आहेत, विशेषत: अश्विन ज्या पद्धतीने संघात आला आणि त्याने गोलंदाजी केली त्यामुळेच भारताचा विजय झाला.”
रोहित शर्मा सामन्यानंतर बोलताना पुढे म्हणाला, “उत्तम सुरुवात करणे केव्हाही चांगले असते, हे एक नवीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे नवीन चक्र आहे. आम्हाला खेळपट्टीची फारशी चिंता नव्हती, फक्त इथे येऊन विजय मिळवायचा होता. आता आम्हाला दुसऱ्या कसोटीत ही जिंकायची आहे. काही नवीन युवा खेळाडूंना संघात संधी द्यायची आहे.” रोहित शर्माच्या या विधानामुळे पुढील कसोटीत काही नवीन खेळाडूंना संधी मिळू शकते, हे स्पष्ट झाले आहे. डॉमिनिका कसोटीत बेंचवर बसलेल्या खेळाडूंबद्दल बोलायचे तर अक्षर पटेलसह मुकेश कुमार, के.एस. भरत, नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांची नावे त्या यादीत आहेत.
आगामी एकदिवसीय आणि टी२० मालिका पाहता संघ व्यवस्थापन खेळाडूंवरील कामाचा ताण हाताळण्यावर भर देणार आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजासारख्या खेळाडूंना विश्रांती मिळू शकते जे सर्व फॉर्मेट खेळतात. सिराजला विश्रांती मिळाल्यास त्याच्या जागी मुकेश कुमार किंवा नवदीप सैनी यापैकी एकाला संधी मिळू शकते. त्याचबरोबर अक्षर पटेल जडेजाची जागा घेऊ शकतो. याशिवाय बॅटिंग युनिटमध्ये कोणताही फारसा बदल होणार नाही.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत. पुढील सामना २० जुलैपासून क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे होणार आहे. भारताने डॉमिनिका कसोटीत यजमानांना एक डाव आणि १४१ धावांनी पराभूत करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्यानंतर, रोहित शर्मा आणि ब्रिगेड आता या मालिका विजयाच्या इराद्याने उतरेल.