रायझिंग पुणे सुपरजाएंट्स -मुंबई इंडियन्स सामन्याचा आज थरार
इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण असलेला रोहित शर्मा हा दुखापतीमधून कसे पुनरागमन करणार, हीच येथे गुरुवारी होणाऱ्या आयपीएल क्रिकेट सामन्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या मुंबई इंडियन्सला रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाशी खेळावे लागणार आहे.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर हा सामना होणार आहे. आयपीएल स्पर्धेनंतर लगेचच चॅम्पियन्स स्पर्धा होणार असल्यामुळे या स्पर्धेतील कामगिरीचा भारतीय संघ निवडताना निश्चितच विचार केला जाणार आहे. भारतीय संघात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी मुंबई संघाचे रोहित शर्मा, हरभजन सिंग, पार्थिव पटेल आदी खेळाडूंच्या दृष्टीने ही स्पर्धा पूर्व चाचणीच ठरणार आहे. मांडीच्या दुखापतीमुळे रोहितला पाच महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. एकहाती विजय मिळवून देण्याची क्षमता असलेला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. मुंबई संघाची मुख्य मदार त्याच्यावरच आहे. लेंडल सिमन्स, किरॉन पोलार्ड यांच्याबरोबरच अंबाती रायुडू, सौरभ तिवारी यांच्याकडूनही फलंदाजीत मोठय़ा अपेक्षा आहेत.
मिचेल जॉन्सन व लसिथ मलिंगा हे दोन्ही गोलंदाज बऱ्याच कालावधीनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये उतरत आहेत. काही वेळा खूप विश्रांतीही खेळाडूंच्या कामगिरीवर अनिष्ट परिणाम करू शकते. त्यामुळेच त्यांच्याही कामगिरीबाबत उत्सुकता आहे. त्यांच्याबरोबरच विनयकुमार, टीम साऊदी, जसप्रीत बुमराह हे अनुभवी गोलंदाजही मुंबईच्या दिमतीला आहेत. श्रीलंकेचे अनुभवी खेळाडू महेला जयवर्धने यांच्याकडे मुंबईच्या प्रशिक्षकपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यांच्या प्रशिक्षकपदाचीही येथे कसोटी ठरणार आहे.
रविचंद्रन अश्विन या प्रभावी गोलंदाजाच्या अनुपस्थितीत पुणे संघाच्या गोलंदाजीची मदार प्रामुख्याने अशोक दिंडा, इम्रान ताहीर, जयदेव उनाडकट, रजत भाटिया यांच्यावर आहे. साडेचौदा कोटी रुपये मोजून विकत घेतलेला बेन स्टोक्स हा इंग्लंडचा खेळाडू येथे किती प्रभावी कामगिरी करतो, यावरच पुणे संघाचे यशापयश अवलंबून आहे. भेदक गोलंदाज म्हणून त्याची ख्याती असली, तरी ट्वेन्टी-२० मध्ये त्याच्या वाटय़ाला फक्त चारच षटके मिळणार आहेत. त्याचा उपयोग तो कसा करतो याचीच उत्कंठा आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथ हा पुण्याचे नेतृत्व करीत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली जरी ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध कसोटी मालिका गमावली असली, तरीही स्मिथ याची वैयक्तिक कामगिरी सातत्यपूर्ण झाली होती. स्मिथ याच्याबरोबरच अजिंक्य रहाणे, फाफ डु प्लेसिस, उस्मान ख्वाजा, मनोज तिवारी यांच्यावरही पुण्याच्या फलंदाजीची बाजू अवलंबून आहे. पुणे संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. नेतृत्वाची जबाबदारी नसल्यामुळे धोनी हा मुक्तपणे फलंदाजी करील अशी अपेक्षा आहे.
- सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता
- स्थळ : गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम
- थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी मॅक्स.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, हरभजन सिंग, श्रेयस गोपाळ, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, कृष्णप्पा गौतम, कुलवंत खेजरोलिया, सिद्धेश लाड, पार्थिव पटेल, दीपक पुनिया, नितीश राणा, अंबाती रायुडू, जितेश शर्मा, करण शर्मा, सौरभ तिवारी, जगदीश सुचित, विनय कुमार, टीम साऊदी, लेंडल सिमन्स, निकोलस पूरन, कीरेन पोलार्ड, मिचेल मॅक्लेघान, लसिथ मलिंगा, मिचेल जॉन्सन, असेला गुणरत्ने,जोस बटलर.
रायझिंग पुणे सुपरजायंट्स : महेंद्रसिंग धोन, मयांक अगरवाल, अंकित शर्मा, बाबा अपराजित, अंकुश बैन्स, रजत भाटिया, दीपक चहार, राहुल चहार, अशोक दिंडा, जसकरण सिंग, अजिंक्य रहाणे, सौरभ कुमार, मिलिंद टंडन, मनोज तिवारी, जयदेव उनाडकत, अॅडम झंपा, बेन स्टोक्स, उस्मान ख्वाजा, लॉकी फग्र्युसन, फॅफ डू प्लेसिस, स्टीव्हन स्मिथ