भारताच्या वन-डे संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा हा क्रिकेटविश्वात हिटमॅन या नावानेही ओळखला जातो. विशेषकरुन वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये रोहित ज्या पद्धतीने आक्रमक फलंदाजी करतो, ते पाहून विराटला हिटमॅन ही पदवी देण्यात आलेली आहे. What the Duck या कार्यक्रमाद्वारे विविध क्रिकेटपटूंची मुलाखत घेणाऱ्या विक्रम साठे यांच्याशी बोलताना रोहितने एक धक्कादायक कबुली दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत असताना आपल्याला रविंद्र जाडेजाला फटकावण्याची इच्छा झाली होती असं रोहितने मान्य केलंय. रोहितसोबत त्याचा मुंबईचा साथीदार अजिंक्य रहाणेही या कार्यक्रमात सहभागी झाला होता.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना एका प्रसंगाची आठवण यावेळी अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी करुन दिली. “दक्षिण आफ्रिकेत जंगल सफारीदरम्यानच्या अनेक आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत. यादरम्यान आम्हाला वाटेत २-३ चित्ते दिसले. आम्हाला वाटलं की आम्ही त्यांच्यापाठीमागे जात आहोत. मात्र काहीकाळानंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही जंगलाच्या पूर्ण आत शिरलो होतो आणि आजुबाजूला काय घडतंय याची आम्हाला जराशीही कल्पना नव्हती. मी, रोहित आमच्या पत्नी व रविंद्र जडेजा एका क्षणानंतर जंगलाच्या बरोबर मध्यभागी पोहचलो आणि त्याच वेळी चित्त्यांनी थांबून आमच्या गाडीकडे मोर्चा वळवला.”
या घटनेबद्दल अधिक माहिती देताना रोहितने रविंद्र जाडेजाला या घटनेसाठी दोषी ठरवलं. “त्या सर्व प्रकाराला रविंद्र जाडेजा जबाबदार होता. चित्ते समोर असताना तो विचीत्र आवाज काढत होता. ते पाहून मी त्याला म्हणालो, अरे तु काय करतोय? आपण जंगलाच्या मध्यभागी उभे आहोत. जर चित्त्यांनी आपल्यावर हल्ला केला तर सगळं संपेल.” मात्र तो प्रसंग आपल्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय प्रसंग असल्याचं रोहित म्हणाला. यावेळी जाडेजाला फटकावण्याची इच्छा झाली होती असंही रोहितने मान्य केलं.