Rohit Sharma T20 World Cup 2024 : एकदिवसीय विश्वचषक मालिकेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. त्यानंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्मा कायम राहणार का? राहुल द्रविड यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून वाढीव मुदत मिळणार का? असे प्रश्न उपस्थित झाले होते. यावर नुकतीच बीसीसीआयने दीर्घ आढावा बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीला बीसीसीआयचे सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि खजिनदार आशिष शेलार उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाचा आढावा, भविष्यातील भारतीय क्रिकेटची वाटचाल आणि सहा महिन्यांनी होणाऱ्या टी२० विश्वचषकासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याचे हिंदुस्तान टाइम्स या वृत्तसंकेतस्थळाने सांगितले आहे. काही दिवसांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ निवडीबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे बातमीत म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून लागोपाठ क्रिकेट खेळणाऱ्या रोहित शर्माला विश्वचषकानंतर विश्रांती देण्यात आली आहे. तो सध्या लंडन येथे कुटुंबासह वेळ घालवतोय. रोहितने व्हर्च्युअली या बैठकीला हजेरी लावली. सहा महिन्यांनी विडिंज आणि यूएसए येथे टी२० विश्वचषक मालिका होणार आहे. “टी२० विश्वचषकासाठी जर मी संघात हवा असेल तर त्याबाबत मला आताच पूर्वकल्पना द्या”, अशी अट रोहित शर्माने या बैठकीला उपस्थित असलेले पदाधिकारी आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यासमोर ठेवली, अशी माहिती दैनिक जागरणने बैठकीला उपस्थित असलेल्या सदस्यांच्या हवाल्याने दिली आहे.
हे वाचा >> World Cup 2024 : रोहित शर्माबद्दल सौरव गांगुलीचे मोठं वक्तव्य! म्हणाला, “टी-२० विश्वचषकात त्याला…”
रोहित शर्मा आगामी टी२० विश्वचषक संघात असावा, असे एकमत बीसीसीआयचे पदाधिकारी आणि प्रशिक्षिक राहुल द्रविड यांच्यात झाले असल्याचेही बातमीत म्हटले आहे. एवढेच नाही तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी२० सामन्यांचेही नेतृत्व रोहित शर्माने करावे, अशी निवड समिती आणि बीसीसीआयची इच्छा होती, मात्र रोहितने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटपासून विश्रांतीसाठी वेळ मागून घेतला. निवड समितीने रोहितची मागमी मान्य केली असून १० डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील टी२० च्या तीन सामन्यांसाठी पुन्हा एकदा सुर्यकुमार यादवकडे नेतृत्व सोपविले आहे. तर त्यानंतर होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा केएल राहुलकडे दिली आहे.
२६ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांचे नेतृत्व मात्र रोहित शर्मा करणार असून त्यावेळी तो संघात परतणार आहे.
हार्दिक पांड्याबाबत निर्णय काय?
विशेष म्हणजे, २०२२ साली ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या टी२० विश्वचषकात पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा एकही आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळलेला नाही. मागच्या विश्वचषकातील उपांत्यफेरीच्या सामन्यात इंग्लंडकडून भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून भारतीय क्रिकेट संघाचे टी२० क्रिकेटचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे होते.
हे वाचा >> विश्लेषण: रोहित शर्माचे भारतीय संघातील भवितव्य काय? कर्णधारपदासाठी अन्य कोणते पर्याय?
याठिकाणी हेदेखील नमूद केले पाहीजे की, बीसीसीआयने कधीही हार्दिक पांड्या हा टी२० सामन्यांसाठी कर्णधार म्हणू कायम असेल असे जाहीर केलेले नाही आणि रोहित व विराट यांनी टी२० मधून कायमची विश्रांती घेतली आहे, याबाबतही बीसीसीआयने कधी भाष्य केलेले नाही. रोहित शर्माने एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी स्वतःहून मागच्यार्षीपासून टी२० क्रिकेटपासून लांब होण्याचा निर्णय घेतला होता. एकदिवसीय विश्वचषक आता संपला आहे, त्यामुळे यापुढेही टी२० साठी रोहिता विचार केला जाणार नाही, असे मानण्याचे कोणतेही कारण नाही.
नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान बांगलादेश विरोधी सामन्यात हार्दिक पांड्याच्या पायाला (घोट्याला) दुखापत झाल्यामुळे त्याला विश्वचषकातून बाहेर पडावे लागले होते. त्यामुळे आगामी टी२० विश्वचषकाबाबत पुन्हा एकदा रोहितचा विचार होऊ शकतो. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलिया विरोधातील टी२० चषक आणि आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकावे लागले आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमधून कधी बरा होईल, याचा कोणताही निश्चित काळ नाही. त्यामुळे आगामी काळात क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटसाठी त्याच्याकडे नेतृत्व देण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
आणखी वाचा >> रोहित शर्मा, विराट कोहली टी २०मधून निवृत्ती घेणार? BCCI च्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष; दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी…!
दुसरीकडे नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरोधातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेमध्ये भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ४-१ ने मालिका खिशात घातली या मालिकेसाठी संघात असणाऱ्या अनेक खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेतील मालिकेसाठी कायम ठेवण्यात आले आहे.