अहमदाबाद: भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भारतीय खेळाडूंची मानसिकता माहीत आहे, असे असतानाही इंदूर कसोटीत आम्हाला अतिआत्मविश्वासामुळे पराभवाला सामोरे जावे लागले, असे त्यांना वाटत असल्यास त्यात तथ्य नाही. आम्हाला बाहेरील व्यक्तींच्या मताने फारसा फरक पडत नाही, असे प्रत्युत्तर भारताचा कर्णधार रोहित शर्माने दिले.
शास्त्री २०१४ सालापासून सहा वर्षे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. सध्या ते बॉर्डर-गावस्कर मालिकेत समालोचन करत आहेत. भारताला इंदूर येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत मोठा पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यानंतर शास्त्री यांनी भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेवर टीका केली होती. ‘आत्मसंतुष्टता आणि अतिआत्मविश्वास भारताला महागात पडला. प्रत्येक गोष्ट तुम्ही गृहीत धरता हे योग्य नाही. ही वृत्ती कधी तरी तुम्हाला खाली आणले,’ असे शास्त्री म्हणाले होते. परंतु चौथ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना रोहितने माजी प्रशिक्षकांची सगळी मते खोडून काढली.
‘‘चार सामन्यांच्या मालिकेत जेव्हा तुम्ही दोन सामने जिंकून आघाडी घेता आणि तिसऱ्या कसोटीत तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागते, तेव्हा आम्हाला अतिआत्मविश्वास महागात पडला असे बाहेरून पाहणाऱ्याला व्यक्तीला वाटत असेल, तर त्याला काहीच अर्थ नाही. खेळाडू आणि संघ म्हणून तुम्हाला चारही कसोटी सामन्यांत सर्वोत्तम कामगिरी करायची असते. दोन सामने जिंकून समाधान मानायचे नसते. ‘ड्रेसिंग रुम’मध्ये नसलेल्या व्यक्तीला आम्ही कशाबाबत चर्चा केली आहे, हे ठाऊक नसते. त्यामुळे आमच्या कामगिरीबद्दल बाहेरील लोकांना काय वाटते याने आम्हाला फारसा फरक पडत नाही,’’ असे रोहित म्हणाला.
‘‘रवी हे काही काळापूर्वीच आमच्या संघाचा भाग होते. त्यांना आमची मानसिकता ठाऊक आहे. त्यांनी आमच्याबाबतीत अतिआत्मविश्वास हा शब्द वापरणे योग्य नाही. परदेशात खेळताना प्रतिस्पर्धी संघ आम्हाला कधीही सामन्यात आणि मालिकेत परतण्याची संधी मिळणार नाही असे डावपेच आखतात. आम्हीही अशीच मानसिकता राखून आहोत,’’ असेही रोहितने स्पष्ट केले.